Saturday, March 07, 2026 02:20:57 AM

Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये कट्टरवादाला 'तलाक', लोकशाहीची नवी पहाट; हे सत्तांतर भारतासाठी का महत्वाचे?

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेवर पुनरागमन केले आहे.

bangladesh election 2026 बांगलादेशमध्ये कट्टरवादाला तलाक लोकशाहीची नवी पहाट हे सत्तांतर भारतासाठी का महत्वाचे

ढाका: शेख हसीना यांच्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेचा अंत आणि त्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या धुक्यातून बांगलादेश आता बाहेर पडला आहे. काल पार पडलेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेशच्या जनतेने 'बॅलेट'च्या माध्यमातून कौल स्पष्ट केला असून, कट्टरवादाला नाकारत विकासाच्या वाटेला पसंती दिली आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील 18 महिन्यांच्या अंतरिम सरकारचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार असून, माजी पंतप्रधान दिवंगत बेगम खालिदा जिया यांची 'बांगलादेश राष्ट्रवादी पार्टी' (BNP) तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी सज्ज झाली आहे.

बीएनपीचा 'विजय', कट्टरपंथीयांची धुळधाण

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 299 पैकी 287 मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले असून 'बीएनपी'ने 211 जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी असल्याने ही लढत बीएनपी विरुद्ध जमात-ए-इस्लामी अशी रंगली होती. मात्र, जमात-ए-इस्लामीला केवळ 70 जागांवर समाधान मानावे लागले आहे. जनतेने कट्टरपंथी विचारधारेला नाकारून लोकशाहीच्या बाजूने कौल दिल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. इतर उमेदवारांनी सहा जागांवर विजय मिळवला असून, हा निकाल बांगलादेशातील राजकारणाची कूस बदलणारा ठरला आहे.

तारिक रहमान यांचा 'गड' शाबूत; लवकरच पंतप्रधानपदी वर्णी

बीएनपीचे सर्वेसर्वा आणि खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी घरच्या मैदानावर म्हणजेच बुगुरा जिल्ह्यातून मोठा विजय संपादन केला आहे. रहमान यांना 216,284 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आबिदुर रहमान यांना अवघी 97,626 मते पडली. निवडणुकीपूर्वीच बीएनपीने जाहीर केले होते की, सत्ता आल्यास तारिक रहमान हेच देशाचे पुढचे पंतप्रधान असतील. त्यामुळे आता ढाक्यात पुन्हा एकदा 'झिया' घराण्याची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. रहमान यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लवकरच त्यांच्या शपथविधीची तयारी सुरू होणार आहे.

हेही वाचा: ADAS Technology Mandatory: अपघातांना ब्रेक; 2027 पासून वाहनांमध्ये ADAS तंत्रज्ञान अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जमातच्या अध्यक्षांचा वैयक्तिक विजय, तरीही स्वप्नभंग

दुसरीकडे, जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांनी ढाक्यातून 82,645 मते मिळवून अनौपचारिकरीत्या विजय मिळवला असला तरी, त्यांच्या पक्षाचे 'इस्लामी सरकार' स्थापन करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. 1971 च्या मुक्ती संग्रामात पाकिस्तानला साथ देणाऱ्या या पक्षाने बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता. 67 वर्षीय शफीकुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष पुन्हा मूळ धरण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आधुनिक बांगलादेशी मतदारांनी कट्टरतेपेक्षा प्रगतीला महत्त्व दिले आहे.

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त आणि नवा अध्याय

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने 10 लाख सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा तैनात केला होता. हिंसाचाराचा इतिहास असलेल्या बांगलादेशमध्ये यंदा मतदारांनी शांततेने मतदान करून लोकशाहीवरचा विश्वास अधोरेखित केला आहे. 18 महिन्यांचा अंतरिम काळ संपवून आता बांगलादेश पुन्हा एकदा पूर्णवेळ लोकशाही सरकारच्या छत्राखाली येत आहे. कट्टरतावादाला मूठमाती देऊन विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी बांगलादेश आता सज्ज झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानसाठी काय आहेत निकालाचे संकेत?

या निकालाचे पडसाद दक्षिण आशियाई राजकारणात मोठ्या प्रमाणावर उमटणार आहेत. पाकिस्तानला बांगलादेशात कट्टरपंथीय सरकार हवे होते, मात्र जमात-ए-इस्लामीच्या पराभवाने इस्लामाबादला मोठा धक्का बसला आहे. भारतासाठी हा निकाल संमिश्र असला तरी सकारात्मक आहे. बीएनपीशी भारताचे संबंध अवामी लीगसारखे मधुर राहिलेले नाहीत, मात्र जमातसारख्या कट्टरवादी शक्तीचा पराभव होणे ही भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. तारिक रहमान यांनी विकासाचा अजेंडा समोर ठेवल्याने, आगामी काळात भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: Petrol Disel Price: धक्कादायक; 'या' कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 80 टक्के वाढीची शक्यता; भारतासाठी धोक्याची घंटा


सम्बन्धित सामग्री