पाकिस्तानने अफगानिस्तानच्या सीमावर्ती भागात शनिवारी उशिरा रात्री मोठी हवाई कारवाई करत तणावाला नव्या उंचीवर नेले आहे. अफगानिस्तान-पाकिस्तान सीमेची विभागणी करणाऱ्या डूरंड लाईन परिसरात पाकिस्तानी लढाऊ विमानांनी जोरदार बॉम्बहल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने हा हल्ला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehreek-e-Taliban Pakistan, TTP) या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर लक्ष्य साधून केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये अनेकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात असून अफगानिस्तानातील तालिबान प्रशासनाने प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे.
अफगानिस्तान माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान एअर फोर्सने (Pakistan Air Force, PAF) अफगानिस्तानातील पक्तिका आणि नंगरहार प्रांतातील अनेक जिल्ह्यांवर हवाई हल्ले केले. विशेषतः बरमाल जिल्ह्यातील एका धार्मिक मदरशालाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या स्फोटांमुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे सीमेलगत असलेल्या सात दहशतवादी तळांवर अचूक कारवाई करण्यात आली. या कारवाईत टीटीपीसह इस्लामिक स्टेट (Islamic State, IS) संबंधित घटकांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र, हल्ल्यांची अचूक ठिकाणे किंवा नुकसानाचा तपशील अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही.
हेही वाचा: Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या खटल्यात काल भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं? वकिलांनी केला खुलासा
दरम्यान, अफगान सूत्रांच्या माहितीनुसार या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 17 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरी भागांवर हल्ले झाल्याचा आरोप करत अफगान तालिबान प्रशासनाने पाकिस्तानवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या घटनेनंतर दोन्ही देशांतील आधीच तणावपूर्ण असलेले संबंध आणखी बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पाकिस्तानने मात्र ही कारवाई अलीकडे इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यांच्या (Suicide Bomb Attacks) प्रत्युत्तरादाखल केल्याचे स्पष्ट केले आहे. दोन आठवड्यांपूर्वी शिया मशिदीवर झालेल्या भीषण स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 160 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती.
गेल्या काही महिन्यांत अफगान भूमीचा वापर पाकिस्तानविरोधी दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याचा आरोप इस्लामाबादकडून सातत्याने केला जात आहे. सीमावर्ती चकमकी, हवाई हल्ले आणि परस्पर आरोपांमुळे दक्षिण आशियातील (South Asia) सुरक्षा परिस्थिती अधिक संवेदनशील बनली असून, पाकिस्तान-अफगानिस्तान संबंध निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे निरीक्षकांचे मत आहे. आगामी काळात या संघर्षाचे राजनैतिक किंवा लष्करी परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: Mumbai Flyovers Condition: सावधान! मुंबईतील 'या' महत्त्वाच्या उड्डाणपुलाला आले अकाली वार्धक्य; गर्डरला तडे अन् गंजलेले लोखंड, महापालिकेचा मोठा निष्काळजीपणा?