खासगी शाळेत हृदयद्रावक घटना! छत कोसळून 27 विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

पेशावरमधील आफ्रिदी आबाद भागात एका खासगी शाळेचे अचानक छत कोसळल्याने झालेल्या अपघातात 27 चिमुकल्या विद्यार्थ्यांसह तब्बल 28 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
खासगी शाळेत हृदयद्रावक घटना! छत कोसळून 27 विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी गंभीर जखमी
school roof collapse

पाकिस्तानमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. पेशावरमधील आफ्रिदी आबाद भागात एका खासगी शाळेचे अचानक छत कोसळल्याने झालेल्या अपघातात 27 चिमुकल्या विद्यार्थ्यांसह तब्बल 28 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही हळहळ व्यक्त होत आहे. मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे वय 7 ते 13 वर्षांच्या दरम्यान होते, तर यामध्ये एका शिक्षिकेचाही समावेश असल्याची माहिती स्थानिक रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर

पेशावरमधील ‘लेडी रीडिंग हॉस्पिटल’चे अधिकारी आसीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण दुर्घटनेत 27 विद्यार्थी आणि एक शिक्षिका असे एकूण 28 जण दगावले आहेत. या दुर्दैवी घटनेत 30 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयाने तातडीने आणीबाणी घोषित करून जखमींवर उपचार सुरू केले आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती अद्याप अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी ‘रेस्क्यू 1122’ च्या रुग्णवाहिका आणि आपत्ती निवारण पथकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! ‘CJP ला अमेरिकेतून निधी पुरवला जातोय’, अमेरिकन गायिकेचा खळबळजनक दावा

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून शोक व्यक्त

या दुर्घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करताना त्यांनी या न भरून निघणाऱ्या नुकसानाचे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य ईश्वर देवो, अशी प्रार्थना केली आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे इमारती व शाळांचे छत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी याच वर्षी जून महिन्यात लाहोरमधील एका शिकवणी केंद्राचे (ट्युशन सेंटर) छत कोसळल्याने डझनहून अधिक मुलांचा जीव गेला होता. तसेच कराचीच्या ल्यारी भागातही एक 5 मंजली इमारत कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शाळकरी मुलांचे जीव धोक्यात येत असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version