Russia Ukraine War: रशियावर पुन्हा एकदा युक्रेनने मोठा हवाई हल्ला चढवला आहे. या ड्रोन हल्ल्यात किमान 16 नागरिक जखमी झाले असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन प्रमुख विमानतळ डोमोडेडोवो आणि झुकोव्स्की तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. रशियाने दावा केला आहे की, एकूण 35 ड्रोनपैकी 28 ड्रोन हवेतच पाडण्यात आले आहेत. हा हल्ला आतापर्यंतचा युक्रेनकडून झालेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, युक्रेनियन ड्रोन हल्ला रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार 10 वाजता सुरू झाला आणि जवळपास पाच तास चालू राहिला. ब्रायन्स्क प्रदेशातील प्रादेशिक राज्यपाल अलेक्झांडर बोगोमाझ यांनी माहिती दिली की, एका युक्रेनियन ड्रोनच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. तसेच, पश्चिम बेल्गोरोड प्रांताचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लाडकोव्ह यांनी सांगितले की, विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांतून एकूण 16 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - South China Sea Crash: अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली; पायलट-क्रू सुरक्षित, तपास सुरू
उड्डाणांवर परिणाम; विमानतळ बंद
ड्रोन हल्ल्यामुळे विमान वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी झुकोव्स्की आणि डोमोडेडोवो विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले. हल्ल्याच्या वेळी उतरण्यासाठी नियोजित अनेक उड्डाणे इतर विमानतळांकडे वळवण्यात आली, तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सर्व उड्डाणे स्थगित ठेवण्यात आली असून प्रवाशांना घरी पाठवण्यात आले आहे.
रशियाचाही प्रत्युत्तर हल्ला
दरम्यान, रशियानेही युक्रेनवर प्रत्युत्तरात्मक हवाई कारवाई केली आहे. रशियन सैन्याने एकूण 100 ड्रोन युक्रेनच्या विविध भागांवर पाडले. यापैकी 90 ड्रोन युक्रेनच्या संरक्षण दलाने हवेतच पाडले.
हेही वाचा - हो, हे खरंय! 'या' देशाच्या मंत्री एकाचवेळी देणार 83 बाळांना जन्म; कसं? वाचा सविस्तर
दरम्यान, युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेन्को यांनी सांगितले की, या रशियन हल्ल्यात 3 नागरिकांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत, त्यात सात मुलांचा समावेश आहे. चार ठिकाणी ड्रोन कोसळले, तर पाच ठिकाणी त्यांच्या अवशेषांमुळे इमारतींचे नुकसान झाले. एका नऊ मजली इमारतीसह अनेक अपार्टमेंट्सची हानी झाल्याचे वृत्त आहे.