न्या. जितेंद्र जैन यांचा विधि विद्यार्थ्यांना कानमंत्र

0
152
jitendra jain mumbai high court justice

प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ मार्च २०२४ : वडाळा येथील डॉ.आंबेडकर लॉ महाविद्यालयात १६ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आभासी न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आभासी न्यायालय स्पर्धेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. यशोधरा वराळे, ज्येष्ठ वकील कायमार्स केकी केरावाला उपस्थित होते. या स्पर्धेत १६ विधि महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी, तुम्ही जेव्हा वकिलीचा क्षेत्रात प्रवेश कराल तेव्हा वकीलांनी कोणताही खटला लढताना सर्वप्रथम संबंधित प्रकरणातील तथ्य जाणून घेतली पाहिजेत. एखाद्या घटनेतील तथ्य ही खूप महत्त्वाची असून प्रथम तथ्य विचारात घेतली जातात, त्यानंतर कायदा येतो. न्यायमूर्तींनी तथ्य विषयी एखादा प्रश्न विचारला तर त्याचे योग्य उत्तर तुम्हाला देता आले नाही तर तुमची प्रतिमा न्यायमूर्तीं समोर प्रभावहीन ठरते, असा कानमंत्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी विद्यार्थ्यांना भाषणातून दिला.

न्या.जितेंद्र जैन यांनी विधि विद्यार्थ्यांना वकीली पेशाबाबत असलेल्या तत्वांची माहिती दिली. न्यायमूर्ती जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, रोज नवीन कायदे येत आहेत. कायद्यात झपाट्याने बदल होत आहेत. दररोज नवीन केस लॉ येत आहेत. त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रात वकीलांनी नेहमी स्वतः अपडेट राहिले पाहिजे. वकीलांनी केसवर संशोधन केले पाहिजे, तरच तुम्ही वकीली क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकता.

तसेच, कायद्याच्या क्षेत्रात नाव कमविण्यासाठी विधि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करणे आवश्यक आहे. न्यायालयात युक्तीवाद करताना वकीलांनी न्यायमूर्तींसमोर बघून बोलले पाहिजे, त्यातून वकीलांचा आत्मविश्वास दिसतो. तुम्ही इकडे तिकडे बघत, पेपर चाळत युक्तीवाद करू लागला तर न्यायमूर्तींचे तुमच्यावरील लक्ष विचलित होते. न्यायमूर्तीचे तुमच्यावरील लक्ष विचलित होऊ नये, याकरीता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून युक्तीवाद करायला हवा, असे मत न्यायमूर्ती जैन यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय आभासी न्यायालय स्पर्धेत चेंबुर कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ या विधि महाविद्यालयाने प्रथम तर खारघर येथील गोखले एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेजने दुसरा क्रमांक पटकावला आहे. डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनालाखाली हे राष्ट्रीय आभासी न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!