मुंबई: 26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेल्या प्रलयंकारी पावसाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस मुंबईकरांच्या मनात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. या दिवशी, निसर्गाने रौद्ररूप धारण केले होते, ज्यामुळे संपूर्ण मुंबई थांबली होती. अवघ्या 24 तासांत 944 मिमी पाऊस पडला, जो शतकातील सर्वाधिक पाऊस आहे. मुंबईतील कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, सायन, माटुंगा, घाटकोपर, धारावी या भागात पाणी गळ्यापर्यंत भरले होते. यासह, अनेकांचे जीवन विस्कळीत झाले होते तसेच, हजारोंचे संसार उद्ध्वस्त झाले होते.
मुंबईतील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले होते. इतकच नाही, तर रेल्वे आणि बस सेवा पूर्णपणे बंद होते आणि हजारो वाहने तासंतास रस्त्यावर अडकून पडली होती. या आपत्तीत एक हजाराहून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावले. या पावसात 37000 रिक्षा, 4000 टॅक्सी, 900 बेस्ट बसेस पाण्याखाली गेल्या आणि सुमारे 5.5 अब्ज रुपयांचे नुकसान झाले. या आपत्तीने अनेकांच्या मनावर कायमस्वरूपी खोल जखम देऊन गेली.
हेही वाचा: Viral Video: फेरीवाल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यात धुतली केळी
20 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आजही मुंबईकरांच्या मनात जिवंत आहेत. त्या दिवसाचे साक्षीदार असलेल्या काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या दिवसाची साक्षीदार असलेली बोरिवलीची मंजिरी घाणेकर म्हणाली की, 'आमच्या चाळीत पाणी घरात शिरलं होतं आणि महत्वाची कागदपत्रे वाहून गेली होती. त्या आठवणी आजही अंगावर शहारा आणतात'. धारावीत राहणारे प्रकाश माने म्हणाले की, 'माझं कॉलेज सुटलं तेव्हा सर्वत्र पाणी साचले होते आणि गळ्यापर्यंत पाणी होते. तेव्हा मी धारावीत राहत होतो. इतकच नाही तर, जवळपास 20 दिवस तिथे पाणी साचले होते. वाहतूक, रेल्वे, बाजार, सर्वकाही ठप्प होते.
20 वर्षांपूर्वी या दिवसांत मुसळधार पाऊस पडत होता. राज्यात आजही अशीच परिस्थिती आहे आणि गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह कोकण किनाऱ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच आहे. तसेच, अनेक भागात पाणी साचले आहे. 26 जुलै रोजी मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.