Saturday, August 16, 2025 12:18:52 PM

पोलीस व्हॅन सोबत बंदूक घेऊन रिल बनवणे तरुणाला पडले महागात

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडला आणि कमरेला पिस्तूल लावत व्हिडिओ बनवला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस व्हॅन सोबत बंदूक घेऊन रिल बनवणे तरुणाला पडले महागात

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकालची तरुण पिढी वाटेल तिथे प्रकार करत असते. मात्र, अनेकदा ही स्टंटबाजी त्यांच्या अंगलट येते. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल परिसरात घडला आहे, जिथे एका तरुणाने पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडला आणि कमरेला पिस्तूल लावत व्हिडिओ बनवला. त्याला 'हम जैसै लोगो के क्रश नहीं केस होते है मिस्टर' असे कॅप्शन देत त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित तरुणाविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

प्रसिद्धीच्या भरात तरुणाने केली सीमापार:

या तरुणाचे नाव आर्ताफ पटेल असे असून, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचे दिसून आले आहे. त्याने चक्क पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने कमरेला बंदूक लावून गुन्हेगारीच्या शैलीमध्ये व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताच क्षणांतच व्हायरल झाला आणि अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.

आरोपीविरुद्ध सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी दिली फिर्याद:

या प्रकाराची माहिती मिळताच, सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी भुषण काशिनाथ राऊत यांनी या प्रकाराची दखल घेत आरोपी आर्ताफ पटेल विरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी आर्ताफ पटेल याच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पागोटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः तरुणाईला इशारा दिला आहे की, 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी कायद्याच्या चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल' असा इशारा पोलिसांनी तरुणाईला दिला.

सध्या सोशल मीडियावर फेमस होण्याची हौस अनेकांना असते. मात्र, त्यासाठी असे प्रकार करणे केवळ स्वतःच्या तसेच समाजाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकते. 'पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून किंवा कायद्याची भीती दाखवणाऱ्या स्वरूपात स्वतःचे व्हिडिओ पोस्ट करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून, अशा कृत्यांना कधीच माफ केले जाणार नाही', असे हर्सूल पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री