प्रविण खंडारे. प्रतिनिधी. नांदेड: नांदेड शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ दिवसाढवळ्या एका तरुणाने एका मुलीला जबरदस्तीने रस्त्यावरून उचलून नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलगी रेल्वे स्टेशन परिसरात राहत होती. या दरम्यान, तिची आणि आरोपीची ओळख झाली होती.
हेही वाचा: अर्धवट झोप म्हणजे आजारांना निमंत्रण; स्लीप सायकल सुधारण्यासाठी 'हे' करा
घटनेच्या दिवशी जेव्हा आरोपी पीडित मुलीला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा, आरोपी आणि पीडित तरूणीमध्ये वाद झाला. काही वेळानंतर, परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर ओढून नेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईल फोनवर शूट केला, जो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ तपास सुरू केला आणि एका आरोपीला अटक केले. तसेच, 'दुसऱ्या आरोपीचा तपास सुरू असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल', अशी माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीसाठी आजचा दिवस खर्चीक; जाणून घ्या