विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर शहरात एक मोठा अनर्थ होता होता टळला. ही घटना पुंडलिकनगर परिसरातील नाथ प्रांगण येथे बुधवारी रात्री घडली होती. ट्यूशनसाठी गेलेल्या या अल्पवयीन मुलीला काही अपहरणकर्त्यांनी जबरदस्तीने चारचाकीत गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि चालकाच्या धाडसामुळे अपहरणकर्त्यांचा डाव अपयशी ठरला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: शिवसेना फुटीनंतर फडणवीस-ठाकरे-शिंदे-अजित पवार पहिल्यांदाच एकत्र
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर परिसरात असलेल्या नाथ प्रांगण येथे 11 वर्षांची मुलगी नेहमीप्रमाणे ट्यूशनसाठी गेली होती. मात्र, काही अपहरणकर्ते या मुलीवर नजर ठेवून होते. जेव्हा ती ट्यूशनमधून बाहेर आली आणि चालक नवनाथ (वय: 35) यांच्या गाडीत बसली. एवढ्यात काही अपहरणकर्त्यांनी तिला जबरदस्तीने गाडीत ओढले. तेव्हा चालक नवनाथने त्यांचा विरोधही केला. एवढ्यातच अपहरणकर्त्यांनी त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यामुळे, त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र, तरीही चालकाने आरडाओरडा करत गाडीचा पाठलाग केला. यादरम्यान गाडी शिवाजीनगर भुयारी मार्गावर होती. आरडाओरडीच्या आवाजामुळे काहीतरी विपरीत प्रकार झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. म्हणून काही जणांनी गाडी थांबवण्यासाठी संबंधित गाडीच्या दिशेने दगड टाकू लागले. त्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी तिला गाडीतून ढकलून दिले आणि ती रस्त्यावर पडली. त्यामुळे, घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी साईनगरच्या दिशेने गाडी फिरवली. मात्र, ज्या गल्लीत ते शिरले होते, तेथील रस्ता संपला होता. समोर जाण्यासाठी अपहरणकर्त्यांनी साईनगर येथील छोट्या मशिदीजवळ चारचाकी गाडी सोडली आणि तेथून पळ काढला. या घटनेची नोंद पुंडलिकनगर ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.