Saturday, August 16, 2025 07:27:58 AM

अक्कलकोट बंद! शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणावर अक्कलकोट बंद पुकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. आरोपी दीपक काटेवर गंभीर गुन्हे दाखल, मोक्का कारवाईची मागणी.

अक्कलकोट बंद शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अक्कलकोट: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज शहरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सकाळपासूनच अक्कलकोटच्या बाजारपेठांमध्ये शांतता पसरली होती आणि व्यापाऱ्यांनी बंदला स्वयंस्फूर्त पाठिंबा दिला.

प्रकरणाचा थोडक्यात आढावा

प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमधील एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित असताना, शिवधर्म फाऊंडेशनचे दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायकवाड यांच्यावर शाईफेक करत धक्काबुक्की केली. हा प्रकार घडल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दीपक काटे व इतरांना ताब्यात घेतले.विशेष म्हणजे, दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द प्रवीण गायकवाड यांनीही भाजपाशी त्यांचा संबंध असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा: 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' -राज ठाकरेंचा संताप

आरोपींच्या मते, ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाऐवजी ‘छत्रपती संभाजी ब्रिगेड’ हे नाव ठेवण्याच्या मागणीसाठी त्यांनी असे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. मात्र या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी मारहाण, दंगल, मालमत्तेची नासधूस, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा गंभीर आरोपांखाली दीपक काटे आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांवर बीएनएस कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

संघटनांचा बंदला प्रतिसाद व आंदोलनाची तयारी

संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि इतर घटकांनी मिळून अक्कलकोट बंदचे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिला असून, शहरातील व्यवहार ठप्प राहिले.

दरम्यान, सकाळी 11 वाजता अक्कलकोट बस स्थानकाजवळ निदर्शनं करण्याची तयारी असून, आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक संघटनांनी केली आहे.
 


सम्बन्धित सामग्री