Sunday, August 17, 2025 02:49:04 AM

उधारीच्या वादातून अमानुष मारहाण; तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

उधारीच्या वादातून अमानुष मारहाण तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 5 आरोपींना अटक केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अर्जुन रतन प्रधान (वय: 30, रा. अंबेलोहळ, ह.मु. वाळूज) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी अर्जुनच्या आईने गावातील प्रधान यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. या रकमेवरून वाद झाला. रागाच्या भरात अर्जुनच्या आईवर फरशी फेकण्यात आली. अर्जुनने ही घटना त्याच्या भावाला फोनवरून सांगितली. मात्र, सायंकाळी अर्जुन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो काही सापडला नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी गावाजवळील एका मोकळ्या जागेत अर्जुनचा अर्धनग्न मृतदेह आढळला.

हेही वाचा: जयंत पाटील शरद पवार गटात फार खुश नाही; गिरीष महाजनांची प्रतिक्रिया

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणात, अवघ्या 24 तासांत पांडुरंग वामन प्रधान (25), अंकुश दिलीप प्रधान (34), अनिकेत संजय काकडे (24), अजय अशोक प्रधान (24), नंदकुमार दादासाहेब बोऱ्हाडे (26) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. विठ्ठल नामदेव प्रधान (38) आणि नीलेश मच्छिंद्र प्रधान (25) यांच्यासह आणखी दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या अमानुष हत्येमुळे आंबेलोहल गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 


सम्बन्धित सामग्री