Saturday, August 16, 2025 08:39:59 PM

जळगावात 85 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या; सोन्याचे दागिने ओरबाडून आरोपी फरार

जळगावातील शेवाळे गावात 85 वर्षीय जनाबाई पाटील यांची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या; सोन्याचे दागिने ओरबाडले, आरोपी फरार.

जळगावात 85 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या सोन्याचे दागिने ओरबाडून आरोपी फरार

जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसरात खळबळ माजवणारी ठरली आहे. गावातील 85 वर्षीय वृद्ध महिला जनाबाई पाटील यांचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. विशेष म्हणजे, हत्या करून आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही लंपास केले असून, सदर घटना अतिशय संतापजनक आणि भीतीदायक आहे.

घटनेचा तपशील
ही घटना जनाबाई यांच्या घरी गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्या घरी एकट्याच होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव पाटील हे त्या दिवशी पाचोऱ्यात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर जनाबाई मृतावस्थेत आढळून आल्या. डोक्यावर लोखंडी रॉडने गंभीर वार केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण तीन तोळे सोन्याचे ऐवज आरोपींनी ओरबाडून नेल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: राहाता पोलिसांची मोठी कारवाई : 4,600 किलो अवैध मांगूर मासे जप्त, दोघांना अटक

पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून तपास सुरू केला आहे. श्वान पथक गावातच फिरल्यामुळे आरोपी गावातीलच असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

गावात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. गावकरी आणि नातेवाईकांमध्ये संतापाची भावना असून, आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा: ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

पोलीसांकडून जनतेला सहकार्याचे आवाहन
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास किंवा काही महत्त्वाची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
 


सम्बन्धित सामग्री