विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीसोबत बोलल्यामुळे रागाच्या भरात चार तरुणांनी एका 17 वर्षीय तरुणाचे 12 तासांसाठी अपहरण केले. इतकंच नाही, तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. 8 जून रोजी घडलेल्या घटनेत उस्मानपुरा पोलिसांनी तपास करून चार अपहरणकर्त्यांना अटक केली. यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असून, यामध्ये एक केटरिंग व्यावसायिकाचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
अनिकेत उद्धव कणसे (रा. पैठण), अभिषेक केसरसिंग शिसोदे (रा. बोलातगाव), महेश बळीराम वाघ (गेवराई, ता. पैठण), अजय गोरख महापुरे (रा. नानेगाव, पैठण) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. शहरात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर अनिकेतचे एकतर्फी प्रेम आहे. पण आशिष तिच्याशी बोलताना पाहून त्याला सहन झाले नाही. अखेर, मित्रांच्या मदतीने अनिकेतने 7 जून रोजी चारचाकीतून 17 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याची बेदम मारहाण केली. सोबतच, अनिकेतने त्याला जीव मारण्याची धमकी दिली होती.