Saturday, August 16, 2025 07:44:11 PM

पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडी सुटणार; 'या' ठिकाणी होणार मेगा टर्मिनल

गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जात आहेत. अशातच, वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी दोन रेल्वे मार्गांची योजना आखली जात आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर वाहतूक कोंडी सुटणार या ठिकाणी होणार मेगा टर्मिनल

पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जात आहेत. अशातच, वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी दोन रेल्वे मार्गांची योजना आखली जात आहे. पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गातील तळेगाव ते उरुळी कांचन या 75 किलोमीटरच्या मार्गासाठी उरुळी कांचन येथे 250 एकरांवर (100 हेक्टर) मेगा टर्मिनल उभारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

हेही वाचा: मुख्यमंत्री पदावर हसन मुश्रिफांची नजर; म्हणाले, 'मुख्यमंत्री झालो तर...'

रेल्वे मार्ग अशाप्रकारे असेल

पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग तळेगाव ते चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास आणि अहिल्यानगर असा असेल. यात एकूण 8 रेल्वे स्थानके असतील. याचा फायदा चाकण, शिक्रापूर, रांजणगाव आणि अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना होणार आहे. यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन असा 75 किलोमीटरचा मार्ग नव्याने बांधण्यात येणार आहे.

हेही वाचा: PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

'4 वर्षात काम पूर्ण करण्यात येणार' - अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, 'रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. हा रेल्वे मार्ग पुढील 4 वर्षात पूर्ण करण्यात येणार असून, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत'. 

रेल्वे मंत्रालयाने असा प्रस्ताव दिला आहे की, 'हा रेल्वे मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार असून त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे'. यासह, तळेगाव येथे न्यू तळेगाव आणि उरुळी कांचन येथे देखील नवीन स्टेशन उभारले जाणार आहे. या दरम्यान, अजित पवार म्हणाले की, 'नव्या रेल्वे मार्गामुळे पुणे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारकडून पुण्यासाठी दोन रिंगरोड तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी कमी होईल'. 


सम्बन्धित सामग्री