मुंबई: धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, यावर आज माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली. वांद्रे न्यायालयाने करुणा शर्मा यांना मुंडे यांच्या पत्नी म्हणून मान्यता देत दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेशही दिला होता. या निर्णयाविरोधात मुंडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
'माझा करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालं नाही' धनंजय मुंडे म्हणाले:
सुनावणीदरम्यान, धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की, 'मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मात्र, माझा करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालं नाही.' त्यानंतर, मुंडे यांचे वकील सायली सावंत यांनी युक्तिवाद करताना सांगितले, 'करुणा शर्मा यांनी लग्नाचे ठोस पुरावे न्यायालयात सादर केलेच नाहीत. जर त्यांनी वसियतनामा आणि स्वीकृतीपत्र दाखवले असले तरीदेखील अन्य कोणतेही वैध पुरावे त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हे पुरावे लग्नाचे प्रमाण देत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात मांडला.'
करुणा शर्मा यांचे वकील म्हणाले:
न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, करुणा शर्मा यांच्या वकिलांना उत्तर देण्याची संधी दिली. त्यांनी सांगितले की, 'सादर केलेले कागदपत्रे देखील महत्त्वाची आहेत आणि त्यातून त्यांच्या विवाहित नात्याचा प्रत्यय येतो.'
धनंजय मुंडे यांच्या वकीलाचे आरोप:
मात्र धनंजय मुंडे यांच्या वतीने असा दावा करण्यात आला की, 'करुणा शर्मा यांनी काही बनावट कागदपत्रे तयार केली आहेत आणि त्यावर कायदेशीर तक्रारही दाखल केली आहे. हे बनावट कागदपत्र खालच्या कोर्टात सादर केल्यानंतरच याचा खुलासा झाला,' असे सायली सावंत यांनी सांगितले.