Sunday, July 13, 2025 11:11:53 AM

'भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी...; इम्तियाज जलील यांची भाजपावर घणाघाती टीका

इम्तियाज जलील यांनी भाजपवर टीका करत शिवसेना फोडल्याचा आरोप केला. उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावं, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचं मत त्यांनी मांडलं.

भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी  इम्तियाज जलील यांची भाजपावर घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली आहे. जलील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महाराष्ट्रात मराठी अस्मितेचे प्रतीक असलेली शिवसेना फोडून भाजपने मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करत, हेच महाराष्ट्राच्या आणि मराठी जनतेच्या हिताचे असल्याचे मत व्यक्त केले.

इम्तियाज जलील म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वैचारिक आणि राजकीय मतभेद असतील, हे खरे आहे. पण उद्धव ठाकरे यांनी कधीच जातीवर आधारित राजकारण केले नाही. ते नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतात. मात्र, त्यांच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी जातीवर आधारित राजकारण महाराष्ट्रात आणले, हे सत्य आहे. पण उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी त्या मार्गावर न जाता, समानतेचा आणि सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला.'

हेही वाचा: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था; वारकऱ्यांची मोठी गैरसोय

तसेच, शिवसेनेच्या फोडाफोडीमागे भाजपचा स्पष्ट हात असल्याचाही आरोप त्यांनी केला. 'शिवसेना म्हणजे मराठी जनतेचा आवाज होता. पण भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी हा आवाज फोडण्याचं काम केलं. ‘खोके’ वाटून आमदारांना फोडलं आणि लोकशाहीची थट्टा केली,' असे जलील म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'गुजराती व्यापारात अडकलेल्या नेत्यांनी मराठी माणसाला दुर्बल करण्यासाठी हा डाव रचला. एक महाराष्ट्रीय म्हणून मला याचा खूप वाईट वाटते.'

जलील यांनी पुढे स्पष्ट केले की, मराठी जनतेचा खरा पाठिंबा आजही उद्धव ठाकरे यांच्या 'ओरिजिनल' शिवसेनेला आहे. 'ज्यांना फक्त पैशाची लालसा आहे, ते अनेकदा शिवसेनेकडे गेले आणि परतले. पण ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची जाणीव आहे, ते आजही उद्धव ठाकरेंबरोबर आहेत,' असे जलील म्हणाले.

या पार्श्वभूमीवर, त्यांनी एका मोठ्या राजकीय संकेताची नोंद केली. 'भारतीय जनता पक्षाला या देशातून हाकलून द्यायचे असेल, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे. हा केवळ राजकीय समीकरणांचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी स्वाभिमानाचा प्रश्न आहे,' असे ते म्हणाले. इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री