रवी ढोबाळे, प्रतिनिधी, सोलापूर: सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर येथे धनाजी संताजी पुरस्काराचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यादरम्यान, प्रसारमाध्यमांना माहिती देताना माजी आमदार बच्चू कडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. युद्ध करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सीमेवर पाठवायला आम्ही तयार आहोत. पाकिस्तान देशाला भारतात विलीन करून घ्या. ज्या प्रकारे इंदिरा गांधींनी 1971 साली पाकिस्तान देशातून बांगलादेशाची निर्मिती केली होती, तशी कारवाई करा, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर सर्वसामान्य जनतेला काय फायदा होणार?
'दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत?' यावर बच्चू कडू यांनी तिखट प्रतिक्रिया देत म्हटले की, 'मुळात दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झालेले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी ऐकीव चर्चा आहे, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर सर्वसामान्य जनतेला काय फायदा होईल.'
मोदींनी एवढे देश फिरले, एक तरी देशांनी पाठिंबा दिला का?
'भारत-पाकिस्तान हा मुद्दा काश्मीरचा नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प काश्मीरबद्दल बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना हे माहित नाही. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. एकाही देशाने उघडपणे भारताला पाठिंबा दिलेला नाही. जितके देश फिरले, त्या देशांकडून पाठिंबा घेण्यात अयशस्वी झाले, त्यामुळे हे कळले की भारताचं विदेशी धोरण पूर्णपणे फेल आहे. चीन हा देश पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे,' अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.