Sunday, August 17, 2025 05:21:01 PM

दर्ग्यावरील कारवाईवर काय म्हणाले खासदार संजय राऊत?

मंगळवारी, शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा शिबीर नाशिक येथे पार पडला. नाशिकमध्ये झालेल्या या भव्य मेळाव्याचे समारोप करताना खासदार संजय राऊत यांनी ठामपणे आपले मत मांडले.

दर्ग्यावरील कारवाईवर काय म्हणाले खासदार संजय राऊत

नाशिक: मंगळवारी, शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा शिबीर नाशिक येथे पार पडला. यादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या भव्य मेळाव्यामध्ये, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवसैनिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण देखील दाखवण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आभासी भाषणातून शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या भव्य मेळाव्यामध्ये राज्यभरातून शिवसेनेतील मान्यवर उपस्थित होते. नुकताच, नाशिकमध्ये झालेल्या या भव्य मेळाव्याचे समारोप करताना खासदार संजय राऊत यांनी ठामपणे आपले मत मांडले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, 'मी उद्धव ठाकरे साहेबांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की नाशिकचे हे शिबिर फक्त आणि फक्त नाशिकच्या शिवसैनिकांमुळेच यशस्वी झाले आहे. भलेही आज आपल्याकडे सत्ता नाही, त्यामुळे कार्यकर्ते असे कसे कमी होऊ शकतात? असा प्रश्न उद्भवतो. पण हीच शिवसैनिकांची खरी ताकत आहे. आज इथे आपला भव्य कार्यक्रम सुरू असताना त्यांनी बाहेर काय केलं? त्यांनी दंगा पाडण्याचे काम केले. शहरामध्ये त्यांनी अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र तरीदेखील आपण हे निर्धार मेळावा शिबीर यशस्वीपणे करून दाखवले आहे.'

पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, 'आज आपण या निर्धार मेळावा शिबीराने हे दाखवून दिले आहे की शिवसैनिक अजूनही खंबीर आहेत. आपण यापेक्षाही वाईट काळ पाहिला आहे. जे सर्वात वाईट काळ पाहतात तेच चांगले भविष्य पाहू शकतात. छावा चित्रपटातून आपण छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहिला, तो संघर्ष आपल्या वाटेला आला आहे. संभाजी महाराजांकडे कवी भूषण होते. कवी भूषण म्हणाले होते की, 'मन के जिते जीत है, मन के हारे हार, हार गये जो बिना लडे उनपर है धिक्कार', असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी छावा चित्रपटातील कवी कलश यांची कविता वाचून दाखवली.

नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झाले  
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पराभवावर खासदार संजय राऊत म्हणाले की, 'नाशिकचा पराभव का झाला? यावर आपण खूप विश्लेषण केले. मात्र या निष्कर्षातून हे सिद्ध झाले की, नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झाले. तुलसी गबार्ड हे नाव लक्षात ठेवा. ही बाई साधीसुधी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण आहे. पंतप्रधान मोदी यांना सिस्टर तुलसी म्हणतात. आता, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत गंगाजलही घेऊन गेले होते. इतकंच नाही, तर त्यांनी हे गंगाजल तुलसी गबार्डला दिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही बाई साधी नसून ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागात आहे. पर्वा तिने सांगितले की ईव्हीएम हायजॅक होऊ शकते. ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात, असेही तुलसीने सांगितले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने आणि मोदींच्या बहिणीने सांगितले. तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटे बोलणार नाही.'

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला सज्ज आहोत  
नंतर खासदार संजय राऊत म्हणाले की, 'हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही कधी हिंदू झालात? एक वाक्य आहे की, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो, तोच स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचा ढोंग करतो. आम्ही ते करत नाही कारण आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना बाळकडू दिला आहे. आजच्या शिबिराचा हाच संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे ठामपणे उभे आहोत. महाराष्ट्रात, देशात उभे राहू आणि तुमचे ढोंग उघडे पाडू.'

एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता  
'सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे जसे की ठाणे मध्ये रिक्षा, चेहरे पे दाढी, तो चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेले आहेत. मला आता भीती वाटते, आज पौर्णिमा आहे की अमावस्या? नेमकं काय आहे? कोणाचा बकरा कापणार आहात? आता आम्हाला आणि महाराष्ट्राला अमावस्या-पौर्णिमा आली की भीती वाटते. एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, फुले, शाहू, आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे', असे खासदार संजय राऊत यांनी घणाघात टीका केली.


सम्बन्धित सामग्री