Wednesday, August 13, 2025 12:09:10 PM

मुंबई विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार उघड; परीक्षा सुरू असतानाच बदलली प्रश्नपत्रिका

वाढी शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरू असताना, जुन्या अभ्यासक्रमानुसारची प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थी शांतपणे पेपर सोडवत असताना अचानक अर्ध्या तासानंतर ही चूक लक्षात आली.

मुंबई विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार उघड परीक्षा सुरू असतानाच बदलली प्रश्नपत्रिका

मुंबई: 8 एप्रिल 2025 रोजी, मुंबई विद्यापीठाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मंगळवारी, वाढी शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरू असताना, जुन्या अभ्यासक्रमानुसारची प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थी शांतपणे पेपर सोडवत असताना अचानक अर्ध्या तासानंतर ही चूक लक्षात आली. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.

 

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले:

विद्यार्थी शांतपणे पेपर सोडवत होते. मात्र अचानकपणे जेव्हा विद्यार्थ्यांची नजर प्रश्नपत्रिकेवर पडली, तेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये झालेली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा प्रकार परीक्षेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा तब्बल अर्ध्या तासानंतर नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. कोणी जुन्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात केली होती, तर कोणी संभ्रमातच बसले होते.

 

मुंबई विद्यापीठाच्या चुका सातत्याने घडतात:

अशा चुका मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाकडून सातत्याने घडत आहेत. यापूर्वीही वेळापत्रकात गोंधळ झाला, तर कधी उत्तरपत्रिकांची विलंबाने तपासणी किंवा चुकीचे गुण मिळणे यासारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी घडलेल्या या गोंधळांच्या मालिकेला अजून एक पान जोडले आहे.

 

युवासेनेचे सिनेट सदस्यांची विद्यापीठ प्रशासनावर जोरदार टीका:

यासंदर्भात युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी विद्यापीठ प्रशासनावर जोरदार टीका करत म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा विभागाने कधी तरी नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. ही केवळ चूक नाही, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. परीक्षा नियंत्रक आणि संचालकांनी त्वरित राजीनामा द्यावा', अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर विद्यार्थ्यांचा संताप:

विद्यार्थ्यांनीही आपला संताप व्यक्त करत प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'आम्ही अभ्यासक्रमात बदल झाल्यापासून नवीन टॉपिक्सवर भर देत अभ्यास केला. मात्र, आज जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आल्याने आम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागला. ही चुकीची जबाबदारी आमच्यावर का टाकली जाते?' असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट असते. त्या वेळेस एकाग्रता, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य गरजेचे असते. अशा वेळी अर्ध्या परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका बदलली गेली तर कोणताही विद्यार्थी संभ्रमित होणारच.

मुंबई विद्यापीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवरील विश्वास उडेल.


सम्बन्धित सामग्री