Sunday, August 17, 2025 05:12:28 PM

'वाह रे अच्छे दिन' म्हणत संभाजी ब्रिगेड यांचे सरकारविरोधात आंदोलन

देशात झपाट्याने वाढत चाललेली महागाई, इंधन व गॅसच्या किंमतीतील दरवाढ आणि सामान्य जनतेच्या खिशावर पडणारा ताण याच्या निषेधार्थ सोलापूरात संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने भव्य आणि आक्रमक निदर्शने करण्यात आली.

वाह रे अच्छे दिन म्हणत संभाजी ब्रिगेड यांचे सरकारविरोधात आंदोलन

सोलापूर: देशात झपाट्याने वाढत चाललेली महागाई, इंधन व गॅसच्या किंमतीतील दरवाढ आणि सामान्य जनतेच्या खिशावर पडणारा ताण याच्या निषेधार्थ सोलापूरात संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने भव्य आणि आक्रमक निदर्शने करण्यात आली. सोलापूरमधील चार पुतळा चौकात, 'वाह रे अच्छे दिन, वाह रे महागाई' असा बोर्ड हातात घेत शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणा देत संतप्त रोष व्यक्त केला.

 

'अच्छे दिन' चे रूपांतर 'बुरे दिन' मध्ये:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले 'अच्छे दिन' चे स्वप्न आता 'बुरे दिन' मध्ये रूपांतरित झाले असून, सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्यात आले आहे, असा आरोप शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात केला. त्यासोबतच, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती सातत्याने वाढत असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

धनाढ्यांचे हजारो कोटी माफ, जनतेला एक रुपयासाठी भिक:

सरकारच्या दुहेरीपणावर कार्यकर्त्यांनी जोरदार हल्लाबोल करत म्हटले, 'केंद्र आणि राज्य सरकार अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या धनाढ्य उद्योजकांचे हजारो कोटींचे असलेले कर्ज एका झटक्यात माफ करतात. मात्र दुसरीकडे, सर्वसामान्य जनतेला कर्ज घेण्यासाठी सरकारकडे हात-पाय पसरावे लागते. इतकंच नाही, तर आमदार आणि खासदार यांचे पगार 25% ने वाढवले जातात. मात्र, दिवसभर अपार कष्ट करूनही सर्वसामान्य माणसाला दोन वेळचे अन्न मिळवणे कठीण झाले आहे. ही शोकांतिका नाही का?'

हे सरकार फक्त श्रीमंतांच्या हिताचे निर्णय घेतंय:

या आंदोलनादरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत एकजूट दाखवली. 'हे सरकार फक्त श्रीमंतांच्या हिताचे निर्णय घेतंय. सामान्य जनतेच्या गरजा, वेदना, आणि अपेक्षांकडे दुर्लक्ष केलं जातंय. ही फसवणूक बंद झाली पाहिजे,' अशी संतप्त प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली.

'कुठे गेले अच्छे दिन?' असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला:

चार पुतळा येथे झालेल्या या निदर्शनांत महिला, युवक आणि जेष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. अनेकांनी 'महागाई कमी करा', 'जनतेचा पैसा जनतेसाठी वापरा' अशा घोषणा दिल्या. काहीजणांनी थेट मोदी सरकारच्या निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत, 'कुठे गेले अच्छे दिन?' असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. या निदर्शनातून स्पष्ट झाले की सामान्य माणूस आता थकला आहे, त्रस्त आहे आणि त्याचा आवाज उठवण्यास सज्ज आहे. संभाजी ब्रिगेडने घेतलेला हा पुढाकार इतर संघटनांसाठीही प्रेरणादायक ठरण्याची शक्यता आहे. सोलापूरात मंगळवारचा दिवस महागाईविरोधातील लढ्याचा नवा अध्याय ठरला. पुढील काळात हा रोष आणखी तीव्र होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


सम्बन्धित सामग्री