सिंधुदुर्ग: जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार संजू हुले यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. वेंगुर्ले बंदर येथील प्रसिद्ध झुलता पूल पर्यटनस्थळी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक भव्य व आकर्षक वाळू शिल्प साकारले आहे, ज्यामध्ये जय महाराष्ट्र चॅनलचा लोगो, महाराष्ट्राचा नकाशा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छबी एकत्रित दिसते.
एक टन वाळू, दीड तासाची साधना
हे वाळू शिल्प तयार करण्यासाठी संजू हुले यांनी सुमारे एक टन वाळूचा वापर केला असून, अवघ्या दीड तासात त्यांनी ही कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती कलात्मक दृष्टिकोनातून अत्यंत सशक्त असून, तिने पर्यटकांचे आणि स्थानिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेंगुर्ल्यातील झुलता पूल हे आधीपासूनच एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे, त्यामुळे या ठिकाणी उभारलेल्या वाळू शिल्पाने चांगलीच गर्दी ओढवली आहे.
हेही वाचा: नदीतील दगडावर चित्र साकारून चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्याकडून जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीस आगळ्यावेगळ्या शुभेच्छा
कलेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त
संजू हुले यांनी या कलाकृतीद्वारे केवळ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, तर त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या भूमिकेबद्दल आपली कृतज्ञता देखील व्यक्त केली. “जय महाराष्ट्र चॅनलने कोकणातील आणि ग्रामीण भागातील कलाकारांना नेहमीच व्यासपीठ दिलं आहे. त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी हे वाळू शिल्प साकारून शुभेच्छा देण्याचा निर्णय घेतला,” असं संजू हुले यांनी सांगितलं.
पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र
या विशेष वाळू शिल्पामुळे झुलता पूल परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, अनेकांनी या कलाकृतीच्या पार्श्वभूमीवर फोटो काढले, व्हिडीओ तयार केले आहेत. अनेकांनी समाजमाध्यमांवर या शिल्पाची प्रशंसा केली असून, ही कलाकृती कोकणातील कलेचं आणि कलाकारांच्या समर्पणाचं प्रतीक ठरत आहे.
कलाकारांची ओळख निर्माण करणारे माध्यम
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी ही गेल्या १२ वर्षांपासून मराठी समाजमनाशी जोडलेली असून, केवळ राजकीय, सामाजिक बातम्यांपुरतीच मर्यादित न राहता, स्थानिक कलाकार, शिल्पकार, चित्रकार आणि नवोदित प्रतिभांना ओळख देण्याचं महत्त्वाचं काम करत आहे. त्यामुळेच कोकणातील संजू हुले यांच्यासारख्या कलाकारांना प्रेरणा मिळते आणि ते आपली कला जनतेसमोर सादर करण्यासाठी उत्साही असतात.
संजू हुले यांच्या या वाळू शिल्पातून उलगडलेली शुभेच्छांची ही कलात्मक अभिव्यक्ती केवळ एक कलाकृती नाही, तर कलाकाराच्या भावना, सामाजिक जाणिवा आणि वृत्तवाहिनीस दिलेला मान याचं प्रतीक आहे. हे शिल्प वेंगुर्ल्यातील पर्यटन आणि संस्कृतीला नवा आयाम देत आहे.