Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम हल्ल्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले की, पंतप्रधान स्वतःला ‘टीम इंडिया’ म्हणून मांडतात, पण त्यांच्या कामकाजात देशातील विरोधी पक्षनेत्यांना, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेतले जात नाही. नीती आयोगाच्या बैठकीतही विरोधकांचा आवाज ऐकला जात नाही, असे त्यांनी नमूद केले.
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने त्याचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप करत, राऊत म्हणाले की शहीद जवानांच्या बलिदानाचे राजकारण करणं म्हणजे त्यांच्या कुटुंबांचा अपमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे सैनिकी कारवाईचे राजकीयकरण करण्यात आले असून, याचे क्रेडिट स्वतः पंतप्रधान घेत आहेत. त्यांच्या लष्करी गणवेशातील होर्डिंग्जमुळे देशवासीयांमध्ये चुकीचा संदेश जातो, असेही त्यांनी सांगितले.
राऊत पुढे म्हणाले, 'तुम्ही युद्ध जिंकत असताना सेनादलांना मागे घेतलं, यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय निर्माण होतो.' त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, जर ऑपरेशन सिंदूर हा भाजपाचा अजेंडा होता, तर पुलवामाच्या आरोपींना अजूनही शिक्षा का मिळाली नाही? त्यांनी युद्ध थांबवलं ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दबावामुळे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
शहीद झालेल्या 26 जवानांच्या पत्नींच्या ‘कुंकवाचा’ अपमान सरकार करत आहे, असं सांगत राऊत म्हणाले की, “तुमच्या घरात अतिरेकी घुसले, तर तिथल्या महिलांनी काय केलं असतं याचा विचार करा.” त्यांनी सरकारला आवाहन केलं की, जे बोलत आहेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागावा, कारण या अपयशाला तेच जबाबदार आहेत.
राज ठाकरे – शिवसेनेचा सकारात्मक संकेत
राज ठाकरे आणि शिवसेनेमधील संबंधांवर बोलताना, राऊत यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनीही मतभेद संपवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र संकटात आहे. मराठी माणूस एकत्र यायला हवा.” काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचे भूतकाळातील अनुभव चांगले नसतानाही सरकार चालवलं, त्यामुळे भविष्याचा विचार करून पुढे जायचं, हेच योग्य असल्याचं ते म्हणाले.
राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानेही भूतकाळ विसरून, नव्या दृष्टिकोनातून विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मत
सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल राऊत म्हणाले, 'ते एक प्रगल्भ आणि संवेदनशील राजकारणी आहेत. त्यांनी मनाची इच्छा व्यक्त केली, ती संपूर्ण मराठी समाजाची भावना आहे.' त्यांच्या वक्तव्यावर पक्षामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच शिवसेनेच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचा सकारात्मक आणि व्यापक दृष्टिकोनही मांडला.