SANAJY RAUT: राजकारणात वादग्रस्त विधानं आणि सडेतोड टीका ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेला हल्लाबोल हे राजकीय वर्तुळात सध्या मोठं वादळ निर्माण करत आहे.
संजय राऊत यांनी थेट राणेंना उद्देशून म्हटले की, 'तुम्ही भाजपचे आश्रित आहात.' त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की राणेंचा स्वतःचा पक्ष नाही, ते फक्त भाजपच्या सावलीखाली आपली ओळख टिकवून आहेत. 'तुमचं जर स्वतःचं बळ असतं, स्वतःचा पक्ष असता, आणि त्या पक्षाने ताकद दाखवली असती तर आम्ही मानलं असतं. पण आज तुम्ही केवळ दुसऱ्याच्या ताकदीवर उड्या मारता, याला आम्ही मान देत नाही,' असं राऊत म्हणाले.
राणे यांनी पाकिस्तानासंदर्भात केलेल्या विधानावरही राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'तुमच्या मोदींनी पाकिस्तान विरोधात दंड थोपटले होते, पण ट्रम्प यांनी दम भरताच, जे सैन्य पाकिस्तानात घुसलं होतं, ते का मागे बोलावलं? त्याचं उत्तर आधी द्या; ऑपरेशन सिंदूर केलं, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार होतो, त्याचं काय झालं?'असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या टीकेत आणखी धार देताना राऊत म्हणाले, 'नवाज शरीफचा केक कोण कापायला गेला? आम्ही नाही गेलो; नरेंद्र मोदीच गेले होते. हे विसरू नका राणे साहेब' या टीकेतून त्यांनी मोदींच्या पाकिस्तान धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राऊतांनी राणेंच्या वयावरही भाष्य करत म्हटलं, 'आपलं वय झालंय, टोपाचे केस पिकले आहेत, त्याचं भान ठेवून वक्तव्य करा. प्रगल्भ भूमिका घ्या.' ही टीका केवळ राजकीय नव्हे तर वैयक्तिक पातळीवर देखील करण्यात आल्याचं जाणवतं.
शिवसेना, भाजपा आणि शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष, ताकद मोजणी आणि जनाधार यावर बोलताना राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे 20 आमदार आहेत, त्यांचे स्वतःचे खासदार निवडून आले आहेत. भाजपकडे किती खासदार आहेत, याचा हिशोब घ्या. नुसते पेट्रोलपंपांचे आकडे मोजू नका, स्वतःचेही आकडे मोजा.'
याशिवाय, राऊत यांनी राज ठाकरे यांचं उदाहरण देत म्हटलं, 'राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे आणि नारायण राणे फक्त आश्रित आहेत.'
या सगळ्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. राऊतांची ही धडक टीका भाजपकडून काय उत्तर मिळवते, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. एक मात्र निश्चित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आरोप-प्रत्यारोपांच्या फटकार्यांनी राजकारणाचा तापमानमान चांगलंच वाढलेलं आहे.