कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरून वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कोल्हापूरकरांनी महामार्गाला संमती दिली आहे” असा दावा केला आहे. मात्र, महामार्ग विरोधी संघर्ष समितीने हा दावा खोडून काढत सरकारला खुले आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कुणाचा विरोध पत्करून हा महामार्ग करणार नाही, मात्र सगळ्यांना विश्वासात घेऊन फायदे समजावून तो पूर्ण करू.” त्यांच्यानुसार, दोन लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले असून काही शेतकऱ्यांनीही महामार्गाला सहमती दर्शवली आहे.
हेही वाचा : खासदार संजय राऊतांनी घेतला नीलम गोऱ्हेंचा समाचार; काय म्हणाले राऊत?
महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला जोरदार विरोध केला आहे. ते म्हणाले, “निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करतो म्हणणारे आता कोल्हापुरातून तो करणारच असे सांगत आहेत. हिम्मत असेल, तर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकती समोर आणा, मग सत्य काय ते कळेल!”त्याचबरोबर फोंडे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले, “हे सरकार कंत्राटदारांना विकले गेले आहे. आम्ही आमच्या गावात आमचे सरकार असल्याचे सिद्ध करू.”
शेतकऱ्यांचा खरा पवित्र काय आहे,
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शक्तिपीठ महामार्गावरील मतभेद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा खरा पवित्रा काय आहे, प्रशासन कसा निर्णय घेणार, आणि विरोधकांची पुढील रणनीती काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.