Santosh Deshmukh Murder Case : बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या 'अत्यंत जवळचा' म्हणून अनेकदा नाव पुढे आलेला वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे, असाही उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. इतके होऊनही आतापर्यंत धनंजय मुंडे यांनी कशालाच दाद दिलेली नाही. मात्र, आता धनंजय मुंडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील अशा चर्चा रंगल्या आहेत.
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे, असाही उल्लेख पोलिसांनी आरोपपत्रात केल्यामुळे या हत्येमागे धनंजय मुंडेच असतील का, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. वाल्मिक कराडला इतकं भयंकर हत्याकांड घडवून आणण्याच्या ऑर्डर्स 'वरून' आल्या असतील, असे अंदाजही अनेकजण बांधत आहेत. यामुळे विरोधकांकडून वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, स्वतः मुंडे यांनी आजपर्यंत याबद्दल किंवा या प्रकरणातल्या वाल्मिक कराडच्या सहभागाबद्दल एकही चकार शब्द काढलेला नाही. मात्र, आता धनंजय मुंडे राजीनामा देतील का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारणही तसंच आहे. करुणा धनंजय मुंडेंची पोस्ट तशीच सूचक आहे. ही फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
हेही वाचा - संतोष देशमुख हत्या प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'परळीचे लोक साधे सरळ.. पण फक्त दोन जणांमुळे..'
देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराड प्रकरणावर काय म्हटलं आहे?
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्वल निकम यांची आपण नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की, जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल.
सीबीआयने आरोपपत्रात काय म्हटलं आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. असं सीआयडीने आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे 'अगदी जवळचे' आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे. आधीही अशी मागणी झाली होती. मात्र, मुंडे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही किंवा पक्षानेही अद्याप तो घेतलेला नाही. आता करुणा धनंजय मुंडे यांनी पोस्ट करत सोमवारी राजीनामा होणार असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे करुणा धनंजय मुंडेंची पोस्ट?
3-3-2025 ला राजीनामा होणार. #karunadhananjaymunde अशी एका ओळीची पोस्ट करुणा धनंजय मुंडेंनी पोस्ट केली आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - CIBIL Scoreचा वापर करून गाड्या चोरण्याची भन्नाट शक्कल, कारची शोरूममधून खरेदी आणि काळ्या बाजारात विक्री..
संतोष देशमुख प्रकरण
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची साधारण तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. यात वाल्मीक कराड मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बीड येथे आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पाच्या कामात खोडा टाकण्याचे काम सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांनी केले. त्याच्या काही दिवस आधी ते खंडणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुदर्शनने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. पण वाद अधिक वाढला. खंडणी मागण्यासाठी गेलेल्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर या घटनेचा राग मानत ठेवून संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना 9 डिसेंबरची आहे. या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.