कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला मारहाण करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात संतापाचे वातावरण पाहायला मिळतंय. याच पार्शवभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचे निर्णय घेतलेत. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एसटी वाहतूक रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत.
हेही वाचा: नाशकात तणाव; दर्ग्यावर कारवाई
काय आहे प्रकरण ?
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? अशी विचारणा करत त्याला मारहाण करण्यात आली. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.
या घटनेच्या आधी काही वेळापूर्वीच बेळगावात एका एसटी कंटक्टरला मारहाण करण्यात आली होती. कंटक्टरला मराठी येत नसल्याने काही तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप होत होता. पण नंतर एका तरूणीशी गैरवर्तन केल्यावरून ही मारहाण झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी कर्नाटक बसच्या वाहकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यानंतर असले कुठलेही प्रकार घडू नये म्हणून आणि प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एसटी वाहतूक रद्द करण्याचे आदेश दिलेत.