Thursday, July 10, 2025 03:59:54 AM

शंभुराजांना वाचवायला कुठे धावले मावळे? काय घडलं बत्तीस शिराळ्यात ?

संभाजी महाराज यांना कैद करून संगमेश्वर इथून वढू - तुळापूर इथे नेलं तेव्हा महाराष्ट्र गप्पा का बसला? इतिहासकारांचा हा दावा खोटा ठरला आहे.

शंभुराजांना वाचवायला कुठे धावले मावळे काय घडलं बत्तीस शिराळ्यात

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या निमित्ताने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न हाच असतो की, संभाजी महाराज यांना कैद करून संगमेश्वर इथून वढू - तुळापूर इथे नेलं तेव्हा महाराष्ट्र गप्पा का बसला? इतिहासकारांचा हा दावा खोटा ठरला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर निवासी संपादक प्रसाद काथे यांनी सादर केलेल्या विशेष कार्यक्रमात अनेक साक्षी पुरावे सादर झाले आहेत. 
"महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा लढण्याची आहे, रडण्याची नाही. छत्रपती शंभूराजेंना औरंग्याच्या छळ छावणीतून घेऊन जात असताना त्यांना वाचवायला कुणी का आलं नाही? असा प्रश्न उपस्थित होत असतो. तेव्हा माझ्या सारख्या महाराष्ट्रभिमानी व्यक्तीला खंत वाटते. शंभूराजेंना वाचवायला कोणी आले नाही हे सत्य नाही. हे सांगण्यासाठी आनंददायी क्षण जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीला प्राप्त झाला आहे. असे श्री. काथे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी नमूद केले. त्यानंतर, वाहिनीच्या स्टुडिओत आलेल्या मान्यवरांची ओळख करून दिली. त्यामुळे, शंभूराजेंनी औरंग्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी तीन घराण्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आपल्या प्राणाची आहुती दिली अशी तीन घराणी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांसमोर आणता आली आहेत. हा पराक्रम इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालाय. 
छत्रपती शंभू महाराजांना वाचवण्यासाठी आलेल्या तीन घराणांचे वंशज, तुळाजी देशमुखांचे एकरावे वंशज श्री. प्रशांत देशमुख, आप्पाशास्त्री दिक्षितांजे तेरावे वंशज श्री. विनय दिक्षित, हरबा वडार यांचे एकरावे वंशज श्री. दिपक पवार या चर्चेत सहभागी झाले. 

'जेव्हा औरंग्या संभाजी महाराजांना घेऊन निघाला तेव्हा त्याने संगमेश्वरपासून वढूपर्यंतचा मार्ग त्याने आक्रमण करायचं ठरवलं. त्यावेळी महाराष्ट्र निपचित पडला होता. महाराष्ट्र काही करत नव्हता असं सांगितलं जातं. तुमच्या पूर्वजांनी तेव्हा काय केलं आणि तुळोजी देशमुखांची सक्रियता काय होती?' असा प्रश्न विचारला असता प्रशांत देशमुख यांनी म्हटले की, "महाराजांना पकडलं त्यावेळी शिराळा तालुक्यातील सय्यदवाडी गावचे ज्योत्याजी केसरकर यांनी माग काढत हा विषय तुळाजी देशमुखांच्या कानावर घातला. त्यावेळी तुळाजी देशमुख, आप्पाशास्त्री दिक्षित, हरबा वडार यांनी चारशे ते साडेचारशे लोकांची शिबंदी गोळा करून शिवाजी महाराजांनी दिलेल्या गनिमी काव्याचा वापर करून या तिघांनी, ५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं, त्याच ठिकाणी एल्गार करून महाराजांना सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला होता. दुर्देवाने तो प्रयत्न अयशस्वी झाला. नाहीतर आज आमचं नाव शिराळ्याचं आमचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं असतं. इतिहासकारांनी याची नोंद घेतली नाही याची खंत वाटते. आगामी काळात याची सत्यता आम्ही पुराव्यानीही मांडू." अशी प्रतिक्रिया देशमुखांनी दिली. 

'औरंग्याच्या दहशतीमुळे महाराष्ट्र शांत होता. उठाव करायची ताकद नव्हती. असा प्रचार होत असताना मग आप्पाशास्त्री दीक्षित यांना लाढयला माणसं कुठून मिळाली?' या प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलताना विनय दिक्षित यांनी सांगितले की, "आप्पाशास्त्री दीक्षित हे छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच स्वराज्यासाठी काम करत होते. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये ते पारंगत होते. त्यांनी व्यायामशाळा काढली होती. ते तरूणांना शस्त्र आणि शास्त्राचे ज्ञान देत. त्यामुळे, त्यांच्या जनसंंपर्कातून त्यांनी सुमारे पाचशे मावळे उभे केले. हरबा वडार हे आप्पाशास्त्री दीक्षितांशी निगडीत होते. हरबा यांना आप्पाशास्त्री यांनी तालमीत प्रशिक्षण दिले होते." असे दीक्षितांनी सांगितले. 

औरंग्याच्या तावडीतून शंभूराजेंना सोडवण्याचा संदर्भ कुठून आणलात असा प्रश्न प्रसाद काथे यांनी मुलाखती दरम्यान दीपक पवार यांना विचारला. दीपक पवार हे हरबा वडार यांचे एकरावे वंशज आहेत. ते म्हणाले, "अनेक पुस्तकात शिराळ्याच्या लढाईचे संदर्भ मिळतात. शिवाजी सावंत यांच्या छावा पुस्तकात पान नं ६२५ आणि पान नं ८१६ वर संदर्भ आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना भुईकोट किल्ल्यावर ५ फेब्रवारीला मुकरब खानने आणून ठेवले. हे दोन उल्लेख छावा पुस्तकात आहेत. ज्योत्याजी केसरकरांविषयी शाहू दफ्तर, शेडगावकर-भोसले यांची बखर आणि छत्रपती थोरले शाहू महाराज या तीन पुस्तकात तीन वेगवेगळ्या घटना लेखकांनी नमूद केल्या आहेत. यामध्ये बत्तीस शिराळा गावच्या घटनेचा उल्लेख असल्याचे दीपक पवार यांनी सांगितले. तर, "शंभूराजेंना वाचवण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले नाहीत, असे आरोप करण्यांना आपण पुरव्यांनिशी दाखवून देऊ आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसून टाकू" असे विनय दीक्षित यांनी म्हटले आहे. तसेच, "मुघलांना रसद पुरवणारी मंडळी याच महाराष्ट्रात होती. त्याचाच परिणाम होत शंभूराजेंचे बलिदान झाले. शंभुराजांना वाचवण्यासाठी गेलेल्या मावळ्यांवर मोगलांच्या मिरजेतील हक्काच्या ठाण्याहून अडीच हजारांचे सैन्य आल्यामुळे लढाईचे चित्र पालटले. मुळात, फंदफितुरीच्या मार्गाने शंभू महाराजांना घनदाट जंगलातून बत्तीस शिराळ्याच्या मार्गातून घेऊन जाणे खानाला शक्य झाले. शंभुराजांना मिरजला घेऊन जाण्यात आलं. फंदफितुरीशिवाय मुकरबखानाला घनदाट जंगलाच्या वाटा माहीत असणे शक्यच नाही." असा महत्त्वपूर्ण खुलासा प्रशांत देशमुख यांनी 'जय महाराष्ट्र' मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना केला आहे. 

या चर्चेत बोलताना, "पुढच्या पिढीला शंभू महाराजांचा प्रेरक इतिहास सांगायला आम्ही तोकडे पडतो आहोत". अशी खणत मांडतानाच, "बत्तीस शिराळ्यातील महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा. तसेच, प्रत्येक शाळेत शौर्यदिन साजरा व्हावा अशी विनंती पवार यांनी शासनाला केली.

चर्चेचा पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

 


सम्बन्धित सामग्री