Sunday, August 17, 2025 04:54:35 AM

कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी सुरू; चाकणकरांची माहिती

कोंढवा येथील महिलेवर स्प्रे मारून झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नमूद केले.

कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी सुरू चाकणकरांची माहिती

पुणे: कोंढवा येथील महिलेवर स्प्रे मारून झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. अशा घटना वारंवार घडत असून, त्यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नमूद केले. तर मुंबईतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची माहिती घेऊन सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी 

पुणे शहर शिक्षण आणि व्यवसायाचे केंद्र असल्याने राज्यभरातून अनेक विद्यार्थी येथे येतात. देहू येथील घटनेतील तिन्ही आरोपी परप्रांतीय असल्याने अशा घटना पुण्यात घडणे दुर्दैवी असल्याचे चाकणकर म्हणाल्या. पोलीस पथके, बीट मार्शल आणि पेट्रोलिंग पथक चांगले काम करत असले तरी, अशा घटनांमुळे शहराच्या प्रतिमेला गालबोट लागत असल्याचे त्यांनी सांगितले. दौंड येथील घटनेत त्यांनी स्वतः पोलिसांशी संपर्क साधून पीडित मुलीला पाठिंबा दिला आणि तिच्याशी संवाद साधला. ही समाजातील वाढती विकृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जळगावातील 'विवाह फसवणूक' टोळी 
चाकणकर यांनी जळगाव जिल्ह्यातील बालविवाह, गर्भलिंग निदान चाचणी, हुंडाबळी आणि इतर महिलांशी संबंधित गुन्हेगारीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांपासून जळगावात चर्चेत असलेल्या 'मुलींची विक्री करणारी टोळी' आणि 'लग्नाच्या नावाखाली फसवणूक' प्रकरणावर त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांनी सांगितले की, काही टोळ्या पैशासाठी मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करतात. एका मुलीचा (गायत्री भैया पाटील) चार वेगवेगळ्या ठिकाणी विवाह झाल्याचे आणि प्रत्येक वेळी पैसे घेऊन काही दिवस राहून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लग्न लावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या धक्क्याने वडिलांनी आत्महत्या केल्याची बातमी जरी प्रसारित झाली असली तरी, वस्तुस्थिती वेगळी असून ही मोठी फसवणूक करणारी टोळी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मुलीला परभणीतून ताब्यात घेण्यासाठी पथक गेले आहे. मुलीवरही गुन्हा दाखल होणार आहे. चाकणकर यांनी या टोळीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. विवाह नोंदणी केंद्रे आणि अशा संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीची चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, या टोळीमुळे जर कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी तात्काळ रामानंद पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी. यातून पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असून, तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सम्बन्धित सामग्री