मुंबई: बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून बीडीडी चाळधारकांना घरांचा ताबा द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. या दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की, 'बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1 अंतर्गत पूर्ण तयार झालेल्या 556 घरांच्या लाभार्थ्यांना ताबा मिळावा, यासाठी येत्या आठवड्यात चावी विरतण कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी पत्राद्वारे सन्माननीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली'.
हेही वाचा: Navi Mumbai Crime : विवाहित महिलेशी प्रेमसंबंधांचा संशय, 25 वर्षीय तरुणाची रबाळे तलावात उडी
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
'उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवू इच्छितो की, माझ्या मतदारसंघातील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1 अंतर्गत 556 घरे पूर्णत: झालेली आहेत. ही घरे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी सज्ज असून, लाभार्थ्यांना मन:पूर्वक वाटते की लवकरात लवकर चाळ्यांचे वितरण झाले पाहिजे. जेणेकरून ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील. हे लाभार्थी अजून किती दिवस भाड्याच्या घरात किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणार? या प्रकल्पांतर्गत नवीन घरे वितरित झाल्यानंतर ट्रान्झिट कॅम्प रिकामे होतील. त्यामुळे, पुढील लाभार्थ्यांना तेथे स्थलांतर करता येईल आणि त्यामुळे, संपूर्ण प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यास चालना मिळेल', असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे, आदित्य ठाकरे म्हणाले की, 'महोदय, येत्या आठवड्यात फेज 1 अंतर्गत पूर्ण तयार झालेल्या 556 घरांच्या लाभार्थ्यांना ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा, ही विनंती'.