बीड: बीड प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी राज्यभरात होणाऱ्या आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी सीआयडी, एसआयडी चौकशी सुरू आहे. न्यायालयातही हा प्रश्न आहे. धनंजय मुंडे कोणत्याही चौकशीला तयार आहेत. यामध्ये धनंजय मुंडे जर दोषी सापडले तर त्यांच्यावर कारवाई करणार असं सांगितलं आहे.
राज्यात अशा प्रकारची घटना अजिबात खपवून घेणार नाही. विरोधी आणि सत्ताधारी काही नेत्यांनीही काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र यामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये, अशीच आपली भूमिका आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. राज्यात कोणत्याही विभागात कायदा- सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे सांगत पवार यांनी गृहमंत्रालयला लक्ष्य केलं आहे.
बीड हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा सहभाग सिद्ध झाला नसला तरी नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, अशी राजकीय चर्चा आहे. याआधी अनेक नेत्यांनी त्यांच्यावरील गुन्हा सिध्द होण्याआधीच नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिले आहेत.