उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले असून, लखनौ येथे झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठी राजकीय घोषणा केली आहे. राज्यात आगामी निवडणुकीत भाजपला सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताची सत्ता मिळवून द्या, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये तातडीने ‘समान नागरी कायदा’ (UCC) लागू केला जाईल, अशी ग्वाही शाह यांनी उपस्थितांना दिली. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांना मोठी धार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिसऱ्यांदा भाजपला आणा, यूसीसी लागू करू
लखनौमधील पक्ष बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर राजकीय निशाणा साधत भाजपच्या आगामी रणनीतीचा पुनरुच्चार केला. देशातील अनेक राज्यांत यूसीसीच्या अंमलबजावणीच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत, त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशच्या जनतेने तिसऱ्यांदा कमळाचे सरकार सत्तेवर आणल्यास या राज्यालाही समान नागरी कायद्याच्या कक्षेत आणले जाईल, असे शाह यांनी ठासून सांगितले. या घोषणेवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी “बडी देर कर दी मेहरबाँ आते-आते…” असा उपरोधिक टोला लगावला आहे.
कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र आणि संघटनशक्तीचा पाढा
उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करताना अमित शाह म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे स्थान अत्यंत भक्कम असून, विरोधक लाख प्रयत्न करूनही पक्षाला धक्का देऊ शकत नाहीत. कार्यकर्त्यांनी महाभारतातील अर्जुनाप्रमाणे केवळ लक्ष्यावर नजर ठेवून कामाला लागावे आणि राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार करावा. यावेळी जुन्या दिवसांची आठवण काढत त्यांनी सांगितले की, 2014 पूर्वी पक्षात निरुत्साह होता; परंतु गावोगावी जाऊन संघटना मजबूत केल्यामुळेच 2014 च्या लोकसभेत 41 टक्के मतांसह 73 खासदार विजयी झाले. तसेच 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 40 टक्के मतांसह 312 जागा जिंकत भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
हेही वाचा – सौरभ दास यांच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयात बॅकग्राऊंड तपासण्यासाठी याचिका दाखल, सर्व संबंधितांना नोटीस
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक
राज्यातील आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका किंवा संभ्रम बाळगू नये, असा आत्मविश्वास शाह यांनी दिला. भाषणाच्या अखेरीस त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीचे आणि नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. योगी सरकारच्या काळात राज्यात झालेली विकासकामे आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यामुळेच जनता पुन्हा एकदा भाजपलाच पसंती देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.