Monday, June 23, 2025 11:17:46 AM

'मृतांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत'; लोकलमधील अपघातावर शिंदेंची प्रतिक्रिया

'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

मृतांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत लोकलमधील अपघातावर शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई: 'मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या 'एक्स' पोस्टवर जनआक्रोश:

'नुसत्या शाब्दिक फुंकरेने गेलेले जीव परत येणार आहेत का? असल्या पोकळ शब्दांनी काहीही होणार नाही. दररोज लोकं कशा परिस्थितीत प्रवास करतात हे आपल्याला माहिती नाही का? ह्यावर आजपर्यंत आपण काय उपाययोजना केल्या? उत्तराची अपेक्षा आहे', अशी पोस्ट राहुल सामंत यांनी केली आहे. 

'करोडो रुपयाचा समृध्दी महामार्ग, अटल सेतू , आंतरराष्ट्रीय  विमानतळ होऊ शकतो पण मुंबई ते कल्याण ह्या रेल्वेमार्गाचा विकास होऊ शकत नाही? लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मृत्यूंना आपण जबाबदार नाहीत का?', असा सवालही राहुल सामंत यांनी उपस्थित केला आहे. 

'तुमच्या निष्क्रियतेमुळे हे घडले आहे पुढेही घडेल तुम्हाला कोणाला काही पडलेली नाही लोकांची... रोज गाड्या उशिरा धावतात विचारले कधी का असं होतं? नुसते महाराजांचे पुतळे उभारले म्हणजे लोकसेवा झाली का?', अशी पोस्ट मंगेश राजवाडे यांनी केली आहे'. 


काय म्हणाले मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी?

'घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात आहे', अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. 'त्याचप्रमाणे, या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही', अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी स्पष्ट केले. 'हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही, तर रुळाच्या बाजूला पडले', असं लीला यांनी सांगितले आहे. हे प्रवासी एक्स्प्रेसमधून नेमके कसे पडले? हे प्रवासी एक्सप्रेसमधून पडले की लोकल ट्रेनमधून? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.


सम्बन्धित सामग्री