जळगाव: हनीट्रॅप प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी, प्रफुल लोढा यांना पोलिसांनी जळगावमधून अटक केली. प्रफुल लोढाबाबत एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन वेगवेगळे दावे करत एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव येथील काही आमदारांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि खडसेंवर सडकून टीका केली. तेव्हा, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनीही मध्यस्थी करत एकनाथ खडसे यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. यावर, एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मंगेश चव्हाणांच्या आरोपांना थेट उत्तर दिले आणि मंत्री गिरीश महाजनानंना ओपन चॅलेंज देत म्हणाले की, 'आपल्या विरोधातील एक तरी पुरावा सादर करुन दाखवावा, आपण राजकारण सोडायला तयार आहोत'.
'हा हत्या आहे की खून आहे किंवा आत्महत्या आहे?, असे प्रश्न माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांनी उपस्थित केले. मी आजही सांगतो की मला खालच्या स्तरावर बोलता येत नाही मंगेश चव्हाणांसारखं. मी अजूनही चॅलेंज करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार माझ्या मुलाच्या संदर्भात खोटं बोलतो, तुला खोटं बोलायची सवय आहे. त्यामुळे, मी तुला चॅलेंज करतो. असेल जर तुझ्यामध्ये खरी ताकद तर खूनाच्या संदर्भामध्ये सीबीआयची चौकशी करा', असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले.