महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली. दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी जिल्ह्यांचे दौरे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील 10 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे अनेक भागांत शेती आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत संबंधित जिल्ह्यांची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी बैठकीत स्पष्ट केले. काही मंत्री आपल्या जबाबदारीच्या जिल्ह्यांत पुरेसे सक्रिय नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करताना मंत्र्यांनी केवळ प्रशासकीय आढावा न घेता शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी भेडसावणाऱ्या अडचणी आणि सरकारकडून अपेक्षित असलेली मदत यांची माहिती गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे. या कामासाठी जिल्हाप्रमुख, आमदार आणि शहरप्रमुखांच्या बैठका घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. गावागावांत जाऊन नागरिकांची परिस्थिती समजून घेणे आणि त्यानुसार मदतीची गरज निश्चित करणे, हा या दौऱ्यांचा महत्त्वाचा उद्देश असेल.
10 दिवसांत अहवाल, मदतीचे नियोजन
संबंधित मंत्र्यांनी दौरे पूर्ण करून पुढील 10 दिवसांत अहवाल सादर करावा, असे शिंदे यांनी सांगितले आहे. या अहवालाच्या आधारे शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मदत देण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. आता या निर्देशांनंतर शिवसेनेचे मंत्री प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त भागांत किती वेगाने पोहोचतात आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.