मुंबई: ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचे मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रकाशन करण्यात आले होते. यादरम्यान, ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत आणि आपली मैत्री कशी झाली, तसेच त्यांच्या व्यक्त होण्यामुळे कट्टरपंथीयांचा त्रास कसा भोगावा लागतो, याची माहिती दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
काय म्हणाले जावेद अख्तर?
शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर म्हणाले की, 'संजय राऊत यांचा स्वभाव आयपीएलच्या खेळाडूप्रमाणे आहे. ते बॅकफूटवर चेंडू खेळून काढण्यात विश्वास ठेवत नाहीत. ते क्रिझमधून बाहेर पडून चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची भीती वाटत नाही'.
पुढे जावेद अख्तर म्हणाले की, 'लोकशाहीला संसद, निवडणुका, नेते, वेगवेगळ्या विचार असलेले पक्ष आणि प्रामाणिक माध्यमांची आवश्यकता आहे. त्याच वेळी, कोणत्याही पक्षाची चिंता न करता स्वतःला व्यक्त करणारे नागरिक देखील आवश्यक आहेत. मी त्यातलाच एक व्यक्ती आहे. जर तुम्ही एका बाजूने बोललात, तर तुम्ही दुसऱ्या बाजूच्या लोकांना दुखावता. पण जर तुम्ही सर्व बाजूंनी बोलायला सुरुवात केली, तर तुम्ही अनेकांची नाराजी ओढवून घेता. माझ्या बाबतीतही तसेच घडले आहे. मला दोन्हीकडून शिव्या दिल्या जातात'.
हेही वाचा: 'अटकेपूर्वी शिंदेंनी मला केला फोन'; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
पाकिस्तान ऐवजी मी नरक निवडेन:
'दोन्ही बाजूचे कट्टरपंथी मला शिव्या देतात. एक बाजू म्हणते, ''तू काफिर आहेस आणि नरकात जाशील''. दुसरी बाजू म्हणते, ''तू जिहादी आहेस, पाकिस्तानात जा''. जर माझ्याकडे पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील, तर मी नरकातच जाणे पसंत करेन', असे म्हणत जावेद अख्तर यांनी कट्टरपंथीयांना टोला लगावला आहे.
पुढे, कट्टरपंथीयांच्या त्रासाबद्दल माहिती देताना जावेद अख्तर म्हणाले की, 'जेव्हा मी 19 वर्षांचा होतो तेव्हा मी मुंबईत आलो. आज मी जे काही आहे, ते केवळ मुंबईमुळेच आहे. हे ऋण मी सात जन्मांत फेडू शकत नाही. मागील 30 वर्षांत मला मुंबई पोलिसांनी चार वेळा सुरक्षा दिली आहे. त्यापैकी तीन वेळा मुल्लांनी दिलेल्या धमक्यांमुळे संरक्षण देण्यात आले होते'.
'नरकातील स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) अध्यक्ष शरद पवार, खासदार साकेत गोखले उपस्थित होते.