Wednesday, June 18, 2025 03:20:08 PM

रोहित पवारांची कीव येते; मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना लगावला टोला

आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी आजची सत्ता उद्या गेल्यावर आपले काय होईल हे विसरू नये, असा इशारा आमदार रोहित पवारांनी गोरेंना दिला आहे. यावर, मंत्री जयकुमार गोरेंनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला आहे.

रोहित पवारांची कीव येते मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना लगावला टोला

मुंबई: मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सत्तेचा आणि पदाचा गैरवापर स्पष्टपणे दिसून येत आहे. पदाचा गैरवापर करून आणि न्याय मागणाऱ्या पीडितेला तुरुंगात टाकून, तसेच सत्य समोर आणणारे निर्भय आणि प्रामाणिक पत्रकार तुषार खरात यांना खोट्या प्रकरणात अडकवूनही हे मंत्री समाधानी आहेत, असे वाटत नाही. म्हणूनच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण सत्ता कायमची नसते. आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी आजची सत्ता उद्या गेल्यावर आपले काय होईल हे विसरू नये, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरेंना दिला आहे. यावर, मंत्री जयकुमार गोरेंनी आमदार रोहित पवारांना टोला लगावत म्हणाले की, 'रावणाला राम म्हणू नका'. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

सत्ता कायमची नसते:

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची फलटणमधील निवासस्थानी शुक्रवारी वडूज पोलिसांनी साडेतीन तास चौकशी केली होती. यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत मंत्री जयकुमार गोरे यांना इशारा देत म्हणाले की, 'सत्ता ही सदासर्वकाळ नसते… आजची सत्ता उद्या जाईल, त्यावेळी आपली काय अवस्था होईल, हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरू नये'.

पीडितेलाच जेलमध्ये टाकलं:

आमदार रोहित पवारांनी मंत्री जयकुमार गोरेंना इशारा देत एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, 'जी पीडित महिला न्याय मागत होती, त्याच पीडित महिलेला गुन्हेगार ठरवले आणि जेलमध्ये टाकले. अशातच, आता रामराजेंसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी पोलीस पाठवून त्यांना त्रास देत आहात. यामागील राजकारण काय आहे? हे जनतेला समजत आहे. ही चौकशी आहे की सुडाची कारवाई? उद्या सत्ता गेल्यावर काय अवस्था होईल, याचं भान सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी ठेवावं'.

'रावणाला राम म्हणू नका' गोरेंचे प्रत्युत्तर:

आमदार रोहित पवारांनी केलेल्या एक्सवरील पोस्टनंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले की, 'रोहित पवार रावणाला राम म्हणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाव राम असले म्हणजे कुणी प्रभू श्रीराम होत नाही. नाव राम असलं तरी आजपर्यंत त्यांनी शकुनीसारखेच काम केलं आहे. मी कुठल्याही तपास यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. तपासात जे काही निष्पन्न झाले, त्या आधारावर चौकशी केली जात आहे'.

मंत्री गोरेंचा रोहित पवारांना टोला:

पोलीस चौकशीबद्दल रामराजेंनी स्पष्टीकरण देणं अपेक्षित असताना अचानक आमदार रोहित पवार रामराजेंची वकिली कोणत्या कारणासाठी करत आहेत? असा प्रश्न मंत्री जयकुमार गोरेंनी केला आहे. 'आम्ही सत्तेच्या विरोधात संघर्ष करून उभे राहिलो आहोत. आजपर्यंत तुम्ही केलेल्या कटकारस्थानाला बळी पडून आम्ही बरंच काही भोगलं आहे. संकटांच्या छाताडावर उभं राहून मी इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे त्यांनी सोज्वळ गप्पा मारून सत्तेचे शहाणपण मला शिकवू नये', असा टोला मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना लगावला आहे.


सम्बन्धित सामग्री