अहिल्यानगर: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टला अखेर देवभाऊच्या सरकारने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे आणि भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि चौकशीसाठी बाहेरील पथक पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी; छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत
विधानसभेत उपस्थित केला शिंगणापूर देवस्थान घोटाळा
शनि शिंगणापूर देवस्थानममध्ये बनावट अॅप्स आणि पावत्या छापून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. 'या ट्रस्टने पूजेसाठी लागणाऱ्या देणग्या त्या बनावट ॲपवरून स्वीकारल्या. इतकंच नाही, तर एक नाही दोन नाही तर असे 3-4 ॲप तयार करण्यात आले होते. तीन ते चार लाख भक्तांनी या बनावट ॲपवर पैसे पाठवले', अशी प्रतिक्रिया विठ्ठल लंघे यांनी दिली. तसेच, संस्थानमधील बोगस भरती प्रक्रियेवर देखील विठ्ठल लंघे यांनी बोट ठेवले. आमदार विठ्ठल लंघे यांच्या मते, 'हा घोटाळा 100 कोटींचा आहे', तर आमदार सुरेश धस यांच्या मते, 'हा घोटाळा 500 कोटींचा आहे', असा दावा करण्यात आला. तर राज्य सरकारने, शनिशिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली होती.
घोटाळ्याचे धक्कादायक आकडे समोर
यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला, ज्यामध्ये घोटाळ्याचे धक्कादायक आकडे उघड झाले.
1 - रुग्णालयात बाग नाही, पण कामावर माणसं दाखवली.
2 - 347 अतिरिक्त कर्मचारी दाखवले (यापैकी कोणाचेही मस्टर नव्हते).
3 - देणगी स्वीकारण्यासाठी 8 आणि तेल देण्यासाठी 4 काउंटर दाखवले, पण प्रत्यक्षात कर्मचारी कमी होते.
4 - गाड्यांसाठी 163 कर्मचारी दाखवले होते.
5 - गोशाळा विभागात 82 कर्मचारी दाखवले, त्यापैकी 26 कर्मचारी रात्री 1 वाजल्यानंतर काम करत होते.
6 - पार्किंग परिसर स्वच्छ करण्यासाठीही कर्मचारी दाखवण्यात आले होते.
7 - 13 वाहनांसाठी 176 कर्मचारी दाखवले होते.
8 - एकूण 2 हजार 474 कर्मचारी कागदोपत्री दाखवले होते, पण प्रत्यक्षात त्यांची नोंदच नव्हती.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
'कार्यकर्त्यांना खाती उघडायला लावून मंदिरातील पैसे त्यांच्या खात्यात वळवले जात होते, असा अहवालात दावा आहे. पूजेच्या पैशासाठी नकली ॲप वापरले जात असल्याचेही समोर आले आहे', असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी ठामपणे उत्तर देताना म्हटले की, 'या सर्व गंभीर आरोपांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल', मुख्यमंत्र्यांनी ठामपणे उत्तर देताना म्हटले. राज्य विधिमंडळाने मंदिरांसाठी समिती स्थापन करण्यासाठी कायदा मंजूर केला असल्याने, भविष्यात शा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.