मुंबई: एकीकडे अहिल्यानगर येथे असलेल्या शनि शिंगणापूर देवस्थानातील ट्रस्टने 500 कोटींचा घोटाळा केल्याची बातमी ताजी असताना दुसरीकडे अहिल्यानगर महानगरपालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात 350 ते 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राऊतांनी केला आहे. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशीसाठी खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: मुलाखतीचा टीझर प्रदर्शित; उद्धव ठाकरे करणार मोठे गौप्यस्फोट
राऊतांचं फडणवीसांना पत्र
दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रात आरोप केला आहे की, 2016 ते 2020 दरम्यान अहिल्यानगर शहरातील सुमारे 776 रस्त्यांमध्ये सत्ताधारी आमदार संग्राम जगताप यांच्या वरदहस्ताने आणि संगनमताने 350 ते 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. 'अहिल्यानगर येथील ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यांसह हा भ्रष्टाचार उघडकीस आणला', असेही राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रारही केली. 'शिवाय त्यानंतर 2020 ते 2023 या वर्षात सुद्धा अशाच कार्य प्रणालीनुसार 200 ते 300 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी', अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महानगरपालिकांवर सध्या प्रशासकांचे राज्य असले तरी, अहिल्यानगरसारख्या नगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदार पालिकेची लूट करत आहेत, ज्यामुळे जनतेला रस्ते आणि आरोग्यसेवा यासारख्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे, खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अहिल्यानगरबाबतच्या पुढील पत्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.