Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या लेखणीतून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे. ‘सामना’ दैनिकाच्या संपादकीय पानावर रविवारी प्रकाशित झालेला ‘रोखठोक’ या सदरातील लेख सध्या जोरदार चर्चेत आहे. 'भाजपला मुंबई ही परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायची आहे' या एका वाक्याने लेखातील टोकदार भावना स्पष्ट होते.
या लेखात संजय राऊत यांनी मराठी अस्मितेपासून ते राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर सत्तेच्या खेळी, भाजपची राजकीय दिशा, शिंदे गटाची भूमिका, आणि सामान्य मराठी जनतेचा संताप यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
मराठी एकजुटीच्या वाऱ्यांनी हादरले सत्ताधारी
राऊत यांनी लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगितले की, सध्या महाराष्ट्रात मराठी एकजुटीचे वारे वाहत आहेत. 5 जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र ही एकजूट काहींना पचनी पडलेली नाही. राऊत लिहितात की, 'राजकीयदृष्ट्याही ठाकरे एकत्र यावेत ही लोकांची इच्छा आहे, पण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ही एकजूट अपायकारक वाटते.' त्यामुळेच संजय राऊतांचा आरोप आहे की, भाजपने मराठी माणसांविरोधात लढण्यासाठी सर्वच पक्षांतील गुंड टोळ्यांना आपल्यात सामावून घेतले आहे.
हेही वाचा: 'मुंबईतून मरण नाही, विजय घेऊनच येणार'; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
शिंदे-फडणवीसांची डील?; दिल्लीतील चर्चांमागचं राजकारण
लेखात राऊत यांनी दावा केला आहे की, उद्धव-राज ठाकरे यांच्या जवळिकीने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. याच घाबराटीतून मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत गेले आणि गृहमंत्री अमित शहांशी गुप्त बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी भाजपात विलीन होण्याची तयारी दर्शवली आणि मुख्यमंत्रीपदाची मागणी केली, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी लेखात केला आहे. त्याचप्रमाणे, 'शहा आणि शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील,' अशी वक्तव्ये खुद्द शिंदे गटातील मंत्री करत असल्याचं राऊतांनी दाखवून दिलं.
ठाकरे बंधू एकत्र आले की बडबड का?
संजय राऊत यांना आश्चर्य वाटतं की, ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर आले, त्या दिवशी काहींनी ‘एक बरा, दुसरा वाईट’ अशी टीका सुरू केली. हेच लोक त्यांचं हास्यास्पद रूप दाखवत आहेत, असं राऊत म्हणतात. 'एकत्र आले तरी बघवत नाही, आणि एकटे राहिले तरी टीका केली जाते', अशा प्रकारच्या दुटप्पीपणावर त्यांनी जोरदार प्रहार केला आहे.
फडणवीस, शिंदे, अदानी; कोणासाठी लढतोय भाजप?
संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र शब्दांत भाजप आणि त्याच्या नेतृत्वावर आरोप केले आहेत.'फडणवीस यांनी एकेकाळी 'विदर्भ माझं राज्य' म्हणत आंदोलन केलं, आणि आज त्यांचं मराठी प्रेम कुठून आलं?' असा सवाल करून त्यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते पुढे लिहितात की, सिंधुदुर्गपासून रायगड, अलिबाग, गोरेगाव, धारावीपर्यंतच्या जमिनी, मुंबईतील गिरणी कामगारांची ठिकाणं आणि झोपडपट्ट्या हे सर्व अदानीच्या ताब्यात जात आहेत. भाजपच्या या भांडवलशाही आणि दलालशाही धोरणामुळे 'मुंबई एक दिवस महाराष्ट्रात राहणार नाही', अशी स्पष्ट आणि कठोर इशारा राऊतांनी दिला आहे.
गुंडांच्या टोळ्यांपासून मराठी जनतेला धोका
राऊत यांचा आणखी एक धक्कादायक दावा म्हणजे, भाजपने सर्वपक्षीय गुंड टोळ्यांना आपल्या पक्षात सामावून घेतलं आहे. मराठी एकजूट मोडून काढण्यासाठी आणि आंदोलन दाबण्यासाठी जनसुरक्षा कायदा लागू करण्याचं धोरण राबवलं जात आहे. 'मराठीसाठी लढणारे उद्या ‘शहरी नक्षलवादी’ ठरवले जातील,' अशी भिती त्यांनी लेखात व्यक्त केली आहे.
मराठी माणसाची शेवटची लढाई सुरू
शेवटी संजय राऊत लिहितात, 'मराठी माणसाला आता मुंबई-ठाणे वाचवण्यासाठी अंतिम लढाई लढावी लागेल.' कारण, राजकारण, गुंतवणूक आणि धोरणं या सगळ्याच पातळ्यांवर मराठी माणसाला गिळून टाकण्याचे डाव आखले जात आहेत.
संजय राऊत यांच्या या रोखठोक लेखाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या धोरणांचा पर्दाफाश करत त्यांनी मराठी जनतेला एकजूट राहण्याचं आवाहन केलं आहे. '