याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी – वर्सोवा निवडणूक प्रकरण तापले
मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीवर संकट घोंगावत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारती लव्हेकर यांनी हारून खान यांच्या विजयाला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत भारती लव्हेकर यांनी गंभीर आरोप करत, उमेदवारी अर्ज भरताना हारून खान यांनी शपथपत्रात महत्त्वाची माहिती लपवल्याचा तसेच अर्ज भरताना विविध चुका केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला धोका निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत हारून खान यांनी अवघ्या १,६०० मतांनी विजय मिळवला होता. मात्र, भारती लव्हेकर यांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली असून पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.ही सुनावणी ठाकरे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण, जर न्यायालयात भारती लव्हेकर यांचा दावा सिद्ध झाला, तर हारून खान यांची आमदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.