Saturday, August 16, 2025 08:38:43 PM

What is Acharsanhita: जाणून घ्या काय आहे आचारसंहिता?

तुम्हाला हा प्रश्न पडला असे्ल Model Code Of Conduct म्हणजेच निवडणूक आचारसंहिता काय असते? आचारसंहितेची गरज का असते? जाणून घेऊयात.

what is acharsanhita जाणून घ्या काय आहे आचारसंहिता

केंद्रीय निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणूक2024 चे वेळापत्रक जाहीर केले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. प्रत्येक निवडणूकीची एक प्रक्रिया ठरलेली असते. ही प्रक्रिया निवडणूकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर सुरू होते. निवडणूक आयोग जेव्हा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतात, तेव्हाच Model Code Of Conduct म्हणजेच निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असे्ल Model Code Of Conduct म्हणजेच निवडणूक आचारसंहिता काय असते? आचारसंहितेची गरज का असते? जाणून घेऊयात. 

देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणूका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग यांनी काही नियम घातले आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणूकीमध्ये सहभाग होणाऱ्या सर्व पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. नियमानुसार जर एखाद्या उमेदवाराने किंवा एखाद्या राजकीय पक्षाने आचारसंहितेचं उल्ल्ंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाऊ शकते, त्यासोबतच आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदीदेखील घातली जाऊ शकते. जर गोष्ट गंभीर असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे. 

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर या आचारसंहितेच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत काय आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम:

1 - सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, आणि नवीन योजना सुरू करता येणार नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमदेखील यादरम्यान घेता येत नाहीत.

2 - आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी गाडी, सरकारी बंगला, गाडी किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूकीच्या प्रचारासाठी करण्यासाठी मनाई आहे.

3 - कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ याच्या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन कधीच करू शकत नाही. 

4 - जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अश्या कोणत्याही प्रकारच्या कृती प्रचारादरम्यान करण्यासाठी मनाई आहे.

5 - आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात किंवा भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर लावणे, असं काहीही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे गरजेचे आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.

6 - मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू किंवा पैसे पाठवण्यास मनाई असते. 

7 - मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांनी गर्दी करू नये, याची दक्षता घ्यावी असे आचारसंहिता सांगते. 

8 - मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. यादरम्यान मतदारांना भुलवणारी कोणतीही गोष्ट तिथे असता कामा नये आणि त्यासोबतच मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.

हेही वाचा: नितेश राणेंची ओवैसीना धमकी ? ‘महाराष्ट्रात येऊन दाखवा’, पाहतो एका पायावर कसा हैदराबादला जातो

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या आचारसंहितेची सुरूवात कधी आणि कशी झाली? आचारसंहितेची सुरूवात 1960 ला केरळ विधानसभेच्या निवडणूकीपासून लागू झाली. राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार केली. 1962 च्या सार्वत्रिक निवडणूकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणूकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले. निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. पण आचारसंहितेतील काही नियम आयपीसीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात. तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे दर वेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना दिसते.


सम्बन्धित सामग्री