मुंबई: भारतीय क्रीडा जगात गेल्या काही महिन्यांपासून घटस्फोटांची मालिका सुरू आहे. हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा सारखे स्टार खेळाडू आधीच त्यांच्या जोडीदारांपासून विभक्त झाले आहेत. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिंपिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपसोबतचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे.
रविवारी रात्री 11.30 वाजल्याचा सुमारास सायना नेहवालने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यात तिने अशी माहिती दिली की, 'आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं. खूप विचारविनिमय केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, विकास आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत. स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी'. अशाप्रकारे, 35 वर्षीय सायनाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला.
हेही वाचा: 'मी कोल्हापुरात शिक्षण घेतलं, मराठी शिकलो'; हिंदी-मराठी भाषावादावर काय म्हणाला आर माधवन?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दोघांच्या वेगळेपणाबद्दल कोणतीही चर्चा किंवा अफवा नव्हती. त्यामुळे त्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढे सायनाने लिहिले की, 'या आठवणींसाठी मी नेहमीच आभारी राहीन आणि पुढे जाताना फक्त चांगल्याचीच अपेक्षा करते. अशा वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि ती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद'.
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सायनाने ऑलिंपिक कांस्यपदक जिंकले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले, तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून बॅडमिंटन जगतात पारुपल्ली कश्यपने आपला ठसा उमटवला.