मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच काउंटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. 33 वर्षीय ठाकूर एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या सात सामन्यांसाठी एसेक्स संघाकडून खेळणार आहे.
ठाकूरला नोव्हेंबरमधील IPL लिलावात कोणत्याही संघाने घेतले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक बळी घेतले असून, त्याचा शेवटचा सामना 2023-24 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झाला होता.
गेल्या काही काळात त्याने घरगुती क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात त्याचा मोठा वाटा असून, त्याने 34 बळींसह 400 हून अधिक धावा केल्या आहेत. 2024-25 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारताने अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डीला संधी दिली होती, पण त्याच्या गोलंदाजीत धार नव्हती. त्यामुळे एसेक्सकडील हा कार्यकाळ शार्दुलसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केल्यास भारताच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला पुन्हा संधी मिळू शकते.
ठाकूरने आपल्या काउंटी क्रिकेट पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, "मी एसेक्स संघात सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी नवीन आव्हानं आणि संधी घेऊन येणार आहे. काउंटी क्रिकेट खेळण्याची माझी इच्छा होती आणि मला 'ईगल्स'चे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद आहे."
शार्दुल हा अलीकडच्या काळात चेल्म्सफोर्डमध्ये काउंटी क्रिकेट खेळणारा भारताचा आणखी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. याआधी उमेश यादव, मुरली विजय आणि साध्याचा भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही काउंटी क्रिकेट खेळले आहे.
ठाकूर सायमन हार्मरसह गोलंदाजी आघाडीवर असणार आहे. त्यांचा पहिला सामना गतविजेता सरे संघाविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे.