पुणे : पुण्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरुन घोडं अडलं आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा केला असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी केली आहे. एका जागेसाठी पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदेंची शिवसेना लढवणार आहे. मात्र, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा असल्याने निश्चिती नाही. विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने बैठकांचा धडाका लावला आहे. या बैठकींच्या सत्रानंतर भाजप विधानपरिषद उमेदवारांची यादी आज, शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.