माढ्याचा तिढा कोणामुळे ?

0
109

माढा, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षासाठी कळीचा ठरलेल्या माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने तो सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मोहिते पाटील आणि आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नाराजीचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. भाजपने निंबाळकरांना माढ्याच्या रणांगणांत उतरविल्याने आता महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांची माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, माढ्यासाठी पवारांचे डावपेच काय असणार, मोहिते पाटील सर्वसहमतीचा डाव टाकणार का, याची प्रचंड चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

माढा लोकसभा उमेदवारीमधून सुरु झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बनू लागला असून रविवारी मोहिते पाटील यांच्या नाराजीनाट्यानंतर सोमवारी खासदार रणजित निंबाळकर हे आपली ताकद दाखवणार आहेत. आज खासदार रणजित निंबाळकर यांनी टेम्भूर्णी येथील आमदार संजयामामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढाचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार संजयामामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित होते. सहा पैकी महायुतीचे पाच आमदार या बैठकीत उपस्थित होते. मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांचीही हजेरी या बैठकीस असल्यानं मोहिते विरुद्ध निंबाळकर हा वाद भाजपासाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.

मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मोहिते पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

मोहिते पाटील पक्ष शिस्त पाळतील – आमदार शहाजी बापू पाटील

बारामती मधील गणिते सुकर करण्यासाठी शेजारील माढा लोकसभा मतदारसंघात काही लोक गणिते बिघडवत आहेत – आमदार जय कुमार गोरे

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाख मतांचे मताधिक्य देऊ, मोहिते पाटील यांची नाराजी भाजपा दूर करेल – आमदार बबनराव शिंदे

महाजनांचे प्रयत्न अपयशी

मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी आलेले भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील मोहिते समर्थकांच्या संतापासमोर हतबल झाले होते. मोहिते पाटील हे भाजपासाठी खूप महत्त्वाचे असून त्यांची नाराजी दूर करणे माझ्या आवाक्याबाहेर असल्याने आता पक्षाचे जेष्ठ नेते त्यांच्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढतील अशी भूमिका महाजन याना घ्यावी लागली आहे.

माढाचे राजकीय महत्त्व

माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. 2019 ला भाजपचे रणजितसिंह नाईक निबांळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.

राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपने या आधीच रणजित निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली असून त्याच्या विरोधात आता शरद पवार गटाकडून मोठी खेळी खेळण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. रणजित निंबाळकरांच्या विरोधात माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यावर खलबतं सुरू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नाराजांचीही साथ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशातच २०१९ नंतर माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झाले आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दित आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे. पण सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं नेतेमंडळींची विभागणी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिली आहे. सध्या अजित पवार भाजपसोबत गेल्यानं या मतदारसंघाच महायुतीची ताकद वाढली आहे.

माढाचा राजकीय इतिहास

शरद पवारांनी २००९ला निवडणूक लढवली
तीन लाखाहून अधिक मताधिक्यांनी भाजपचे सुभाष देशमुखांचा पराभव केला
२०१४ला राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत उमेदवार होते
विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता.
२०१९ला विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात आले
२०१९ला मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकर यांना मदत केली
निंबाळकरांनी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला.

दबावनाट्य

रविवारी दिवसभर अकलूजमध्ये महाभारत घडत असताना विद्यमान खासदार हे मतदारसंघातील इतर आमदार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. आता मोहिते पाटील याना शांत करण्यासाठी भाजप तिकीट बदलणार का नाराज झालेले मोहिते पाटील हाती तुतारी घेऊन भाजपाला दणका देणार याचे चित्र येत्या चार दिवसात पाहायला मिळणार आहे. पण प्रेशर गेमपुढे आता माढ्यात भाजपने एक पाऊल मागे घेतल्यास इतर सर्वच ठिकाणी असणाऱ्या नाराजी दूर करताना पक्षाने दिलेल्या उमेदवारी बदलण्याचा दबाव वाढत जाणार आहे. आता मोहिते पाटील यांच्या बेरीज वजाबाकीचे गणित भाजपाला घालावे लागणार असून जर मोहिते वजा केले तर त्यांना माढा जिंकताना खूप शिकस्त करावी लागेल. तशात माढा येथील निंबाळकर यांची उमेदवारी बदलून मोहिते पाटील याना दिल्यास सहापैकी पाच आमदारांची नाराजीचा विचारही भाजपाला करावा लागेल.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!