गोंदिया: गोदिंयात शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला शाळेतील ही घटना आहे.
पालक मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. आई वडिलांनंतर शिक्षक मुलांवर चांगले संस्कार करतील असा विश्वास पालकांना असतो. म्हणूनच ते एवढ्या विश्वसाने आपल्या मुलांना शाळेत ज्ञान घेण्यासाठी पाठवतात. मात्र गोंदियात शिक्षकानेच विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार केला आहे. शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची तक्रार 1098 या चाइल्ड हेल्पलाइन नंबरवर देण्यात आली होती. यानंतर आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात रवानगी करण्यात आली.
हेही वाचा: व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मराठी वापरल्याने नवी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्यावर 4 मित्रांचा हल्ला
शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
गोंदियातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. शामराव रामाजी देशमुख असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो 53 वर्षाचा आहे. या शिक्षकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम 4, 6, 12 व बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकाने वर्ष 2023 ते 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाले आणि त्याच्यावर 18 जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. 21 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाच्या तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.