सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात ‘ओंकार’ नावाच्या हत्तीवर पेटती मशाल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची गंभीर दखल घेत वन विभागाने चौकशी सुरू केली असून कर्तव्यावर असलेल्या तीन वनरक्षक आणि चार हाकारे अशा एकूण सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर वन विभागाची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील कास गावात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. शांतपणे वावरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीच्या दिशेने पेटती मशाल फेकण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा व्हिडिओ वन विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली.
हेही वाचा: ऑक्टोबर हिटची चाहूल! महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढणार; हवामान विभागाचा मोठा अंदाज
घटनेच्या वेळी परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन वनरक्षक आणि चार हाकारे यांना वन विभागाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून या घटनेबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, मशालीचा वापर नेमका कोणी केला, याचीही चौकशी केली जात आहे.
नेमकी घटना कशी घडली? चौकशी सुरू
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सावंतवाडी वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहेत. हत्तीला नियंत्रित करण्यासाठी किंवा त्याला दूर ठेवण्यासाठी मशालीचा वापर करण्यात आला होता का, तसेच ती मशाल वन विभागातील कर्मचाऱ्याने वापरली की एखाद्या खासगी व्यक्तीने फेकली, याचा तपास केला जाणार आहे.
हेही वाचा: हार्बर लाईनवर लोकलचा खोळंबा! तांत्रिक बिघाडामुळे लोकल 25 मिनिटे ठप्प; प्रवासी हैराण
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी, त्यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी आणि इतर व्यक्ती यांची माहितीही तपासली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
दोषींवर कारवाईचा इशारा
उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण चौकशीनंतर संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास नियमानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.