मुंबई: गुरुवारी, शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे यांनी अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या हेतूंबद्दल मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. राजू वाघमारे म्हणाले की, 'बॉलीवूडमधील हे तीन खान फक्त त्यांच्या चित्रपटांमध्येच देशभक्ती दाखवतात. मात्र, त्यांच्याकडून सैन्याच्या सन्मानार्थ एकही पोस्ट येत नाही. दुसरीकडे, भारताकडून युद्धबंदीची विनंती करणारा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू पराभवाचा आनंद साजरा करण्यासाठी रॅली काढत आहे. परंतु इथे मात्र हे तिन्ही खान मौन बाळगले आहेत'.
हेही वाचा: ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींनी घेतल्या 45 गुप्त बैठका
काय म्हणाले राजू वाघमारे?
'हे अगदी खरे आहे की पराभवानंतरही शाहिद आफ्रिदीसारखे लोक त्यांच्या पराभवाचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी आणि पाठिंबा मिळविण्यासाठी रॅली आणि मिरवणुका काढत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बॉलीवूडमधील अनेक कलाकार अजूनही घरी बसून आहेत आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये देशभक्ती दाखवत आहेत. शाहरुख, सलमान किंवा आमिर या तिन्ही खानपैकी कोणीही सैन्याबद्दल काहीही पोस्ट केले नाही किंवा काहीही म्हटले नाही. हे तिन्ही खान भारतातील मोठे कलाकार असल्यामुळे, ते जे काही बोलतात त्याला खूप महत्व असते. मात्र भारताच्या कठीण परिस्थितीमध्ये जर हे तिन्ही खान गप्प राहिले, देशाला आणि आपल्या भारतीय सैन्यांना पाठिंबा दिला नाही, तर त्यांचा काय फायदा आहे? जर त्यांनी असेच सुरू ठेवले तर शिवसेना त्याचा पूर्णपणे निषेध करेल आणि शिवसेना या तिन्ही खानांना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर देईल', असे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे म्हणाले.
हेही वाचा: 'वॉशिंग्टन पोस्ट' कडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
पुढे राजू वाघमारे म्हणाले की, 'बॉलीवूडमधील इतर कलाकारांनी सैन्यांच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंदूरबद्दल पोस्ट केले. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, अजय देवगण, कृती सेनन, अक्षय कुमार यांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी एक्सवर पोस्ट केले. मात्र या तिन्ही खानांनी यावर मौन बाळगले आहे. त्यांना पाकिस्तानवर प्रेम आहे की भारतासाठी त्यांचे प्रेम कमी झाले आहे? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. जर या बॉलीवूड कलाकारांची अशी वृत्ती असेल तर शिवसेना ते मुळीच सहन करणार नाही. त्यांना शिवसेना शैलीत उत्तर दिले जाईल'.