Sunday, August 17, 2025 04:36:51 PM

Zee Cine Awards 2026: कोकणातील कला-संस्कृतीला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ; ‘झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्गात होणार

सिंधुदुर्गमध्ये होणार ‘झी सिने अवॉर्ड 2026’; कोकणातील पर्यटन व सांस्कृतिक वारशाला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ, स्थानिकांना रोजगाराच्या संधी

zee cine awards 2026 कोकणातील कला-संस्कृतीला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ ‘झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्गात होणार

Zee Cine Awards 2026: कोकण म्हणजे कलेचे माहेरघर! निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भूमीला केवळ हिरवीगार शेती, समुद्रकिनारे आणि किल्लेच नव्हे, तर एक समृद्ध सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे. कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक असे विविध क्षेत्रांतील मान्यवर महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही लाभले आहेत. आता याच कोकणाला एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार असून, झी समूहाने ‘झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्गमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

काल मुंबईत पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड 2025’ या कार्यक्रमास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षीचा ‘24वा झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्ग येथे घेण्याची अधिकृत घोषणा केली. ही बातमी समजताच कोकणात उत्साहाचं वातावरण पसरलं असून, सर्व स्तरांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

नितेश राणे म्हणाले, 'हा केवळ एक पुरस्कार सोहळा नसेल, तर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोकणातील जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करणारा ऐतिहासिक क्षण असेल. बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार, निर्माता-दिग्दर्शक कोकणात येतील. इथल्या सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेतील. यामुळे कोकणातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.'

राणेंनी या घोषणेसोबतच एक व्हिडिओदेखील आपल्या सोशल मीडिया एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक लोककला, खाद्यसंस्कृती आणि माणुसकीने नटलेली कोकणची माती या सगळ्याचा स्पर्श या कार्यक्रमात दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘झी सिने अवॉर्ड’सारखा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेला कार्यक्रम कोकणात घेण्याचा निर्णय हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल. स्थानिक कलाकारांना या निमित्ताने मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर करता येईल आणि कोकणची संस्कृती देशभर पोहोचवता येईल.

सध्या झी समूह आणि राज्य सरकार यांच्यात कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजन सुरू झाले असून, याची अधिकृत माहिती लवकरच दिली जाणार आहे. कोकणातील जनतेसाठी हा निश्चितच गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

'>NITESH_RANE_TWITTER_POST


सम्बन्धित सामग्री






Live TV