Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना काल शनिवारी रात्री घडली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी हजारो भाविक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. तेव्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला. ज्यात 12 महिला समावेश आहे. तसंच 15 हून अधिक जण या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरिल चेंगराचेंगरी घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तातडीने मदत जाहीर केली आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा - नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी
दिल्ली घटनेच्या चौकशीसाठी समिती गठित
दिल्ली रेल्वे स्थान चेंगराचेंगरी घटनेची चौकशी करण्यासाठी 2 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रयागराज जंक्शनवरील व्यवस्थापन अधिक कडक केले आहे. रेल्वे स्थानक आणि फूट ओव्हर ब्रिजवर आरपीएफ पोलीसचा बंदोबस्त लावला आहे.
दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात 18 पैकी 15 जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते. 2 जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, इतर जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - आता रस्त्यावर धावणार ट्रेन! नितीन गडकरींनी नागपूरमध्ये भारतातील पहिल्या रोड ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदी, राहुल गांधींसह मान्यवरांनी व्यक्त केलं दुःख
दिल्ली रेल्वे स्थानक चेंगराचेंगरी दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरएक पोस्ट लिहली असून त्यात त्यांनी, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळं मी व्यथित झालो असून ज्यांनी आपल्या कुटुंबियातील प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसंच जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या सर्वांना यंत्रणांकडून योग्य ती मदत दिली जाईल, असं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदीसंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट टाकत मृतांना श्रद्धांजली दिली आहे. यात राहुल यांनी या घटनेला सरकारला जबाबदार धरलं आहे.